राज्य व केंद्र शासनाच्या घोषणा फसव्या-खा.पटेल

0
8

भंडारा,दि.11 : देश पातळीवर विकासाच्या नावावर विविध फसव्या घोषणांची भरमार सुरु आहे. लोकसभा व राज्यसभेत प्रस्ताव मांडून, पास करुन सामान्य जनतेला भूलथापा देण्याचे कार्य राज्य व केंद्र शासन सातत्याने करीत असल्याचा आरोप खासदार प्रफुल पटेल यांनी केले. भंडारा तालुका-शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बुथ कमिटी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास मार्गदर्शन करताना खा. पटेल बोलत होते.
भंडारा तालुका निहाय राष्ट्रवादी काॅंग्रेस  पार्टी बुथ कमिटी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन गुरूवारी करण्यात आले होते. मेळाव्याचे उद्घाटन खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षनी खासदार मधुकर कुकडे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार राजेंद्र जैन, माजी राकाँचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुध्दे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, माजी आ. अनिल बावनकर, कैलाश नशीने, धनेंद्र तुरकर, रेखा ठाकरे, नरेंद्र झंझाड, नितीन तुमाने, सुमेध शामकुंवर, महेंद्र गडकरी, संजय केवट, कल्याणी भुरे आदी मंचावर उपस्थित होते.
खा. पटेल म्हणाले की, बाबासाहेबांच्या विचाराला मानणारे आम्हीच असे सांगून केवळ भाजपाला मदत करण्यासाठी नविन संघटना अस्तित्वात येत आहे. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना केवळ हरविण्यासाठी पैसे घेवून या संघटना समोर येत आहे. सुवर्ण समाजाला आरक्षणाच्या नावावर १० टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. ज्यांच्या मासिक पगार सत्तर हजार व पाच हेक्टर जमीन आहेत, ते मगासलेले नाही, पण गरीबांना खरचं या आरक्षणाचा फायदा होईल का? असा प्रश्न उपस्थित होतो. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी, सरकारचे काहीच काम नसतांना आपण मागे का पडत आहोत, याचा प्रामाणिक विचार करुन पुढील निवडणुकीसाठी जय्यत तयारीत असावे, अशा कानपिचक्या घेतल्या.
याप्रसंगी भंडारा तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद क्षेत्रातील गावनिहाय बुथ कमिटीच्या सदस्यांच्या ओळख परेड घेऊन त्या गावातील पक्षनिहाय माहिती बुथ सदस्याकडून घेण्यात आली. तसेच गावातील समस्या जाणून घेतल्या व प्रत्यक्ष ओळख घेऊन उत्कृष्ट कार्यकर्त्यांचे कौतुकही केले. यावेळी सरिता मदनकर, प्रा. नारायणसिंग राजपूत, स्वप्नील नशीने, राजकुमार माटे, देवचंद ठाकरे, अशपाक पटले, हर्षा कराडे, मंजुषा बुरडे, रत्नमाला वैध, माधुरी देशकर, अ‍ॅड. नेहा शेंडे, स्वाती खवास, उत्तम कळपाते, गिता माटे, सुनिल शहारे, अनिल सुखदेवे, बबन मेश्राम, प्रभु फेंडर, हितेश सेलोकर, निलीमा गाढवे, रामरतन वैरागडे, आरजु मेश्राम, सुभाष तितिरमारे, जिल्हा परिषद सदस्य, नगर परिषद पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामीण महिला कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.