वाघाच्या अवयव तस्करीमागे दोन वनमजूर

0
23

अमरावती,दि.13 : वाघांची नखे, दात, हाडे तस्करीमागे दोन रोजंदारी वनमजुरांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. वनविभागाच्या पथकाने शनिवारी (दि. 12) पुन्हा एकाला अटक केली. त्यामुळे अटक आरोपींची संख्या सातवर पोहोचली.अटकेनंतर ओंकार कास्देकरला शनिवारी (दि. 12) न्यायालयासमोर हजर केले होते. यापूर्वी अटक केलेल्या राजेश जामकर, सुनील बेलसरे, सुरेंद्र बेलसरे, सुरेश जावरकर, बशीर शहा सह अन्य एक अशा सहा जणांना अटक केली होती. तेसुद्धा 15 पर्यंतच वनकोठडीत आहेत.
ओंकार रोम्या कास्देकर (वय 55, रा. मेमना), असे शनिवारी (दि.12) अटक झालेल्या व्यक्तीचे नाव असून, त्यालाही न्यायालयाने मंगळवारपर्यंत (दि. 15) वनकोठडी सुनावली. घटनास्थळापर्यंत आणणे व वाघाचे दात, हाडे व नखे हे अवयव दुसऱ्या ठिकाणी पोहोचविण्यात कास्देकरचा समावेश असल्याची माहिती पुढे येत असल्याचे सहायक वनसंरक्षक अशोक पराड यांनी दिली. महत्त्वाची बाब म्हणजे ज्या व्यक्तींना मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या संरक्षक कॅम्प किंवा इतर महत्त्वाच्या ठिकाणी रोजंदारी तत्त्वावर मजुरीसाठी ठेवल्या गेले होते, त्यातील दोघे लोभापायी वाघांचे अवयव तस्करीत सहभागी असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. ज्या सात जणांना तीन दिवसांत पूर्व मेळघाटच्या वनविभागाने अटक केली; त्यातील दोघे हे वनमजूर आहेत. परंतु, सातपैकी कोणते दोघे मजूर आहेत, त्यांना अधोरेखित करण्यास वनाधिकाऱ्यांनी नकार दिला. वाघांची नखे, दात, हाडे हे चिखलदरा तालुक्‍यातील मरियमपूर येथील जंगलातून या टोळीच्या हाती लागले असल्याची माहिती आहे. परंतु, तपास अधिकाऱ्यांकडून त्याला दुजोरा मिळू शकला नाही.