साहित्यिकांनी मांडलेल्या विचारांवर समाज उभा-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

0
16

* 92 व्या अ. भा. साहित्य संमेलनाचा समारोप

यवतमाळ, दि. 13 : भारतीय समाज हा विविध भाषा, संस्कृती आणि प्रदेशात विखुरलेला आहे. अशा समाजात विविध मते तयार झालेली असतात, होत राहतात. भारतीय संस्कृती मुल्याधिष्ठित असणे, हे आपले वैशिष्ट्य आहे. ते साहित्य, संस्कृती, कला आणि कवितेतून मिळालेले आहे. साहित्यिकांनी मांडलेल्या विचारांवर समाज उभा आहे. लोकशाहीत मतभेद असणे गैर नाहीत, पण मनभेद असू नयेत, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

यवतमाळ येथे आयोजित 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप झाला. तीन दिवस श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद लाभलेल्या संमेलनाच्या समारोप कार्यक्रमालाही रसिकांची गर्दी झाली होती.

समारोप कार्यक्रमाला पालकमंत्री तथा स्वागताध्यक्ष मदन येरावार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे, आमदार डॉ. अशोक उईके, राजू तोडसाम, संजीवरेड्डी बोदकुरवार, राजेंद्र नजरधने, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, उद्घाटक वैशाली येडे, महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. विद्या देवधर, नगराध्यक्षा कांचन चौधरी,  कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते, कार्यवाह प्रा. विवेक विश्वरूपे, इंद्रजीत ओरके, विलास देशपांडे आदी उपस्थित होते.

श्री. गडकरी म्हणाले, परंपरेतील काही कालबाह्य बाबी सोडून विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्यमशिलतेच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचे आहे. प्रत्येक भारतीयांच्या अंगात मुळातच सहिष्णूता आहे. येणारे शतक मुल्याधिष्ठित भारतीय समाजाचे आहे. सामुदायिक प्रयत्नातून आपल्याला पुढे जायचे आहे. प्रत्येक क्षेत्रात काळानुसार बदल करावे लागतील. समाज आणि राष्ट्राच्या उपयोगाचे जे असेल ते आपल्याला स्वीकारावे लागेल.

पुस्तकांत विचारांचा ठेवा आहे, तो संमेलनाच्या माध्यमातून घराघरात पोहचणार आहे. लोकप्रबोधनाचे काम साहित्य संमेलनातून होत आहे. संगीत, साहित्य, शिक्षण संस्कारांचा परिणाम मानवी जीवनावर होतो. वैशाली येडे यांना उद्घाटक म्हणून आमंत्रित केल्याने संघर्षाने जीवन जगणाऱ्यांचा सन्मान झाला आहे. चांगलेपणा, चांगली  गुणवत्ता ही कुणाची मक्तेदारी नाही, ती आपण अंगिकारली पाहिजे. संघर्ष करीत असतांना संघर्षातून जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. यश-अपयश हे जीवनात येतच असते, त्यातून न खचता आत्मविश्वासाने व संघर्षाच्या बळावर पुढे गेले पाहिजे.

राज्याला सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. मराठीचा महिमा राज्याच्या बाहेर गेल्यावर कळतो. सामाजिक समस्या सांस्कृतिक क्षेत्रातून समोर येतात. लोकशाही टिकविण्यासाठी साहित्यिकांनी जनजागृती केली. राष्ट्राचा विकास करण्यासाठी सर्व घटकांच्या मदतीची आवश्यकता असते. समाज आणि राष्ट्राला घडवायचे असेल तर पारदर्शकता आणि विकासात्मक दृष्टीकोन असला पाहिजे. प्रत्येकाच्या योगदानातून गुणात्मक परिवर्तन घडेल. चांगले काम करणाऱ्यांचा सन्मान व वाईट काम करणाऱ्यांना दंड केला पाहिजे. प्रत्येक थोर पुरुषाचे जीवन हे प्रेरणादायी असून त्यातून आपल्याला शिकण्यास मिळते, असे श्री. गडकरी म्हणाले.

केंद्रीय गृहराज्यमंत्री अहिर म्हणाले, संमेलनामुळे मराठीची ओळख देशभर होण्यास मदत मिळते. मराठीचे वैभव आणि महत्व वाढविण्याचे काम देखील या संमेलनातून होत आहे. उत्कृष्ट आयोजनाबद्दल त्यांनी धन्यवाद दिले. मराठी भाषिकांनी दिल्लीतही विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, संमेलनाच्या आयोजनातून यवतमाळ एक उत्कृष्ट सांस्कृतिक केंद्र असल्याचे येथील नागरिकांनी दाखवून दिले. सर्वसामान्यांच्या पाठिंब्यामुळे संमेलन यशस्वी करू शकलो. पुन्हा आयोजनाची संधी दिली, तर असेच स्वागत करू. यवतमाळकरांनी वऱ्हाडी पद्धतीने तीन दिवस उत्कृष्ट आदरतिथ्य केले. रसिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून हे संमेलन यशस्वी केल्याचे सांगितले.

संमेलन यशस्वी केल्याबदद्ल आभार व्यक्त करून संमेलनाध्यक्षा डॉ. ढेरे म्हणाल्या, संमेलनातील परिसंवाद आणि कवीकट्टाला दर्दींची गर्दी लाभली. संवादासाठी एकत्र येण्याचा हट्ट यवतमाळकरांनी सोडला नाही. प्रचंड संख्येने श्रोत्यांनी व साहित्यिकांनी गर्दी केली. अनेक नामवंत साहित्यिक यवतमाळच्या भूमीत तयार झाले. यवतमाळातील संमेलनाचे संमेलनाध्यक्ष पद भूषविलेल्या ग.दी. माडगुळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षात यवतमाळातच संमेलन होत आहे, ही आनंदाची बाब आहे. साहित्य व्यवहारांच्या केंद्रस्थानी ग्रंथालये असावीत. मुलांना कोश वाङमयाकडे वळविणे गरजेचे आहे. त्यामुळे अधिकृत व विश्वसनीय माहिती मिळण्यास मदत होणार आहे. तसेच इतर राज्यातील दुर्मिळ ग्रंथ संपदा टिकविणे देखील आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कुलगुरू डॉ. चांदेकर आणि डॉ. विद्या देवधर यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते द. तू. नंदापूरे,  सुभाष शर्मा आणि रविंद्र क्षीरसागर यांचा त्यांच्या कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांनी प्रास्ताविक केले. संचालन प्रा. घनश्याम दरणे यांनी केले. प्रारंभी राहुल एकबोटे यांनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाला मराठी साहित्य महामंडळ तसेच घटक संस्थांचे पदाधिकारी व्यासपिठावर उपस्थित होते.