ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांना कवी कालिदास पुरस्कार

0
38

मुंबई (प्रतिनिधी),दि.१४ :  दैनिक ‘प्रहार’चे राजकीय संपादक, कवी, लेखक आणि प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांना यावर्षीचा ‘राज्यस्तरीय कवी कालिदास पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. अखिल भारतीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या तिस-या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या निमित्ताने विविध पुरस्कारांची घोषणा रविवारी करण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथे उभारण्यात येणा-या भव्य ‘मल्हारराव होळकर साहित्य नगरीत’ अखिल भारतीय आदिवासी धनगर साहित्ये संमेलन १८, १९ आणि २० जानेवारी रोजी संपन्न होणार आहे. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी कवितेच्या क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना ‘कवी कालिदास पुरस्कार’ जाहीर झाला आहे. शामसुंदर सोन्नर हे पत्रकार, कवी आणि कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. दुष्काळग्रस्त भागातील शेतक-यांच्या वेदना त्यांनी आपल्या कवितेतून मांडलेल्या आहेत. विधिमंडळात दुष्काळावर चर्चा होते, तेव्हा अनेक आमदार शामसुंदर सोन्नर यांच्या कवितांतून आपल्या भावना व्यक्त करतात. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल समाजाच्या सर्वस्तरातून त्यांच्यावर अभिनंदानाचा वर्षाव होत आहे.