सप्तखंजेरी वादक सूर्यवंशी यांना यंदाचा संत चोखामेळा पुरस्कार जाहीर

0
14

नागपूर ,दि.१४ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, यांच्या सार्वजनिक उपक्रमांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर यांच्यावतीने दिला जाणारा दूसरा संत चोखामेळा पुरस्कार महाराष्ट्रातील ख्यातनाम सप्तखंजेरी वादक तुषार सूर्यवंशी यांना प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी नागपूर येथे केली.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सार्वजनिक उपक्रमांतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर यांच्यावतीने सामाजिक क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे कीर्तनकार, प्रबोधनकार व गीतांच्या माध्यमातून समाजात महापुरुषांचे, संत महात्म्यांचे विचार पोहोचविण्याकरिता प्रबोधन करणाऱ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान यांच्यावतीने मागील वर्षापासून संत चोखामेळा पुरस्कार देण्यात येतो. दि. 14 जानेवारी संत चोखामेळा यांच्या जयंतीचे औचित्य साधून यंदाचा संत चोखामेळा साहित्य पुरस्कार महाराष्ट्रातील ख्यातनाम, सप्तखंजेरी वादक तुषार सूर्यवंशी यांना देण्याची घोषणा राजकुमार बडोले यांनी नागपुरात केली.
श्री. सूर्यवंशी यांनी संपूर्ण महाराष्ट्र तसेच आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, पंजाब इत्यादी राज्यामध्ये संविधान जनजागृती, ग्राम स्वच्छता अभियान, आदर्श गाव, तंटामूक्ती अभियान, व्यसनमुक्ती, निर्मल गाव, शिक्षण, आरोग्य, बालसंस्कार, शासनाच्या जनकल्याणकारी योजना, परिवर्तनवादी विचार, नेत्रदान-रक्तदान इत्यादी विषयामधून फुले-शाहू-आंबेडकर, संत गाडगे बाबा, संत चोखामेळा, संत तुकडोजी महाराज, संत कबीर, अण्णाभाऊ साठे, संत रविदास इत्यादी संत महापुरुषांचे परिवर्तनवादी विचार समाजातील तळागाळापर्यंत प्रबोधनाच्या माध्यमातून पोहोचविण्याचे कार्य केले आहे. तुषार सूर्यवंशी यांनी संपूर्ण भारतात 1800 पेक्षा अधिक कार्यक्रम सादर केले आहेत. आतापर्यंत तुषार सूर्यवंशी यांना विदर्भ गौरव पुरस्कार, महाराष्ट्र रत्न पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा व्यसनमुक्ती पुरस्कार, समाजप्रबोधन पुरस्कार, नागपूर भूषण पुरस्कार, युवा कलारत्न पुरस्कार, फुले-शाहू-आंबेडकर समता पुरस्कार असे विविध 45 पेक्षा अधिक पुरस्कार मिळाले आहेत. या संपूर्ण कार्याची व प्रबोधनाची दखल घेत यंदाचा दूसरा संत चोखामेळा साहित्य पुरस्कार तुषार सूर्यवंशी यांना प्रदान करण्यात येत आहे.पुरस्काराचे वितरण दिल्ली येथे प्रमुख पाहूण्यांच्या उपस्थितीत होणार आहे, असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले.