मुख्य बातम्या:

विनापरवाना बसमध्ये विद्यार्थी नेणार्या मुख्याध्यापकावर आरटीओची कारवाई

गोंदिया,दि.14 ः-गेल्या काही महिन्यात गोंदिया जिल्ह्यात झालेल्या अपघाताकडे लक्ष देत विद्यार्थी वाहून नेणार्या वाहनांची कसून तपासणी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या तपासणी पथकाने सुरु केली आहे.गेल्या महिन्यात मुंडीपार एमआयडीसीमध्ये झालेल्या अपघातानंतर तर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी संबधित शाळेच्या मुख्याध्यापकावरच कारवाईसंबधीची भूमिका घेतली आहे.आजही जिल्ह्यातील बहुतांश शाळांतील बसेससोबतच चारचाकी वाहनामध्ये वाहतूक नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत ठेवून प्रवास करावा लागत आहे.त्यामुळे सरळ मुख्याध्यापकांवरच कारवाई करण्यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे.

डिसेंबर 2018 पासून चालू महिन्यात उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या फिरत्या पथकाच्या निदर्शनास विद्यार्थी वाहून नेणारे वाहन जे आढळले त्यांची तपासणी करण्यात आली.त्या 25 वाहनापैकी 5 शाळांच्या वाहनावर कारवाई करीत मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यासंबधीचे पत्रच शिक्षणविभागाला पाठविण्यात आले आहे.त्या शाळामध्ये  तिरोडा येथील असीम सराफ सेंट्रल अ‍ॅकेडमीच्या बस क्रमांक एमएच ३५-पी ०५७३ मध्ये २0 विद्यार्थीची वाहतूक करतांना १९ डिसेंबर रोजी पकडण्यात आले.सरांडी येथील प्रगती हायस्कूल आश्रमशाळेची बस क्रमांक एमएच ३१-बीबी २९२५ ला परवानगी नसताना १९ विद्यार्थ्यांची वाहतूक करतांना ३ जानेवारी रोजी पकडण्यात आले. गोरेगाव येथील एम.सी.पी. स्कूलच्या बस क्रमांक एमएच ३५-ई १७७२ मध्ये  १५ विद्यार्थ्यांची वाहतूक करतांना २० डिसेंबर रोजी,गोंदिया तालुक्यातील अंभारा येथील दिल्ली पब्लीक स्कूलच्य बस क्रमांक एमएच ३५-पी २१३२ मध्ये एका विद्यार्थ्याची वाहतूक ५ जानेवारीला तर मोगर्रा येथे बस क्रमांक एमएच ३५-एजी ०२४३ मध्ये ५० विद्यार्थी नेत असताना मोटार वाहन निरिक्षकांच्या पथकाला तपासणी दरम्यान पकडले असता आढळून आल्याने कारवाई करण्यात आली आहे.

Share