देवरीच्या दुकान गाळे वाटपात घोळ?-चरणदास चव्हाण यांचा आरोप

0
8

देवरी,दि.17 : जिल्हा परिषद गोंदिया व पंचायत समिती देवरी यांच्याकडून वर्ष २०१७ मध्ये येथील पं.स. परिसरातील खाली जागेत गरजू व सुशिक्षित बेरोजगार लोकांसाठी दुकानगाळे बांधण्यात आले. या दुकान गाळे वाटप समितीने आपसात संगनमत करून मोठ्या प्रमाणावर घोळ करीत गाळे वाटप केल्याचा आरोप गोंदिया जिल्हा फुटपाथ दुकानदार युनियनचे अध्यक्ष चरणदास चव्हाण यांनी प्रसिद्धिपत्रकातून लावला आहे..

प्रसिद्धी पत्रकात चरणदास चव्हाण यांनी म्हटले, गोंदिया जि.प.ची तत्कालीन दुकान गाळे समितीचे पदाधिकारी व अधिकारी आणि समितीचे सदस्य देवरी पं.स.चे गटविकास अधिकारी मनोज हिरूळकर तसेच गाळेधारक देवराज जगणे यांनी आपसात संगनमत करून देवरी पं.स. परिसरात बांधण्यात आलेले दुकान गाळ्यांचे वाटप केले. यात गरीब, होतकरू व सुशिक्षित बेरोजगार लाभार्थ्यांना वंचित ठेवून देवराज दरवेश जगणे याला येथील दुकान गाळे देण्यात आले. या अगोदरच डी.आर.डी.ओ. जि.प. गोंदियाचे प्रमाणकानुसार दरवेश मनिराम जगणे यांना येथील दुकान गाळे देण्यात आले आहे. परंतु त्याच कुटुंबातील व्यक्ती देवराज दरवेश जगणे यास वर्ष २०१७ मध्ये दुकान गाळे कसे काय देण्यात आले. एकाच यंत्रणेमार्फत एकाच कुटुंबातील व्यक्तींना दोनदा लाभ कसा काय मिळाला? असा प्रश्न उपस्थित करून दुकानगाळे वाटपात शासनाच्या नियमानुसार या दुकानगाळेचे दर महिन्याला भाडे वसूल करून ते जिल्हा निधीमध्ये जमा करावे, असे जि.प.च्या मुख्याधिकारी यांचे आदेश असूनसुद्धा सदर भाडे रक्कम दर महिन्याला भरणा करून घेतले नाही. तसेच देवराज जगणे यांनी ज्या चप्पल दुकानाकरिता या गाळ्याची मागणी केली होती त्या जागी फळांचे दुकान दिसत आहे. असे चरणदास चव्हाण यांच्या आरोपावर देवरीचे गटविकास अधिकारी मनोज हिरूळकर व गाळेधारक देवराज जगणे यांचे म्हणणे आहे. देवराज जगणे हे संयुक्त कुटुंबात राहात नसून कुटुंबातून वेगळे राहतात आणि त्यांचे राशन कार्डही वेगळे आहे. यात कुठे असे लिहिले आहे की, वेगवेगळ्या राहणाऱ्या दोन कुटुंबातील लोकांना शासकीय योजनेचा लाभ घेता येत नाही म्हणून आणि दुसरी बाब म्हणजे देवराज जगणे यांची आर्थिक परिस्थिती आता बरोबर नसल्यामुळे त्यांनी सदर चप्पल दुकान बंद करून फळाचे दुकान लावले आहे. याबाबत रितसर लेखी माहिती गोंदियाचे मुख्याधिकारी व देवरीचे गटविकास अधिकारी यांना दिली आहे. परंतु देवरी पं.स. परिसरातील दुकान गाळे येथील होतकरू, गरजू व सुशिक्षित बेरोजगार लाभार्थ्यांना वंचित ठेवून देवराज जगणे यास दुकानगाळे कसे काय देण्यात आले. या गोष्टीचा विरोध करीत येथील फुटपाथ दुकानदारांनी या क्षेत्राचे आमदार, मुख्य व उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया व देवरी पं.स.चे गटविकास अधिकारी यांना १८ ऑगस्ट २०१७ रोजी निवेदन देऊन न्याय मागितला. यानंतर गोंदिया जिल्हा फुटपाथ दुकानदार युनियनमार्फत गोंदियाचे जिल्हाधिकारी यांना ९ ऑक्टोबर २०१८ रोजी निवेदन देऊन या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती देऊन या प्रकरणाची चौकशी करून न्याय मिळवून देण्याची विनंती केली होती. .