चिचगडला अपर तहसील कार्यालयाचा दर्जा प्राप्त

0
6

देवरी,दि.18 : अतिदुर्गम आदिवासी बहुल व नक्षलप्रभावी तालुका म्हणून ओळखल्या जाणार्‍या देवरी तालुक्यातील ककोडी-पालंदूर या क्षेत्रातील जनतेला तालुक्याच्या क्षेत्रात असलेल्या तहसील कार्यालयात कामासाठी जाताना ४0 किमी अंतराची पायपीट करावी लागत होती. त्यामुळे मागील ७ वर्षांपासून अपर तहसील कार्यालयाची मागणी करण्यात आली होती. त्यानुरूप तालुक्यातील चिचगडला अपर तहसील कार्यालयासाठी मंजूरी प्रदार करण्यात आली असून अपर तहसीलदारासह ९ पदांना मंजूरी देण्यात आली आहे. विदर्भात फक्त चिचगड आणि देवलपार अशा दोनच ठिकाणी अपर तहसील कार्यालयाला मंजूरी देण्यात आली आहे.
देवरी येथील तहसील कार्यालयात कामासाठी ४0 किमीचे अंतर कापून नागरिकांना यावे लागत होते. हा परिसर नक्षलग्रस्त प्रभावित असल्याने सायंकाळी परतीच्यावळी साधन उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे चिचगड येथे अनेक वर्षांपासून अपर तहसील कार्यालयाची मागणी करण्यात आली होती. त्यानुरूप तालुक्यातील चिचगडला अपर तहसील कार्यालयासाठी मंजूरी प्रदान करण्यात आली आहे. तसेच कार्यालयाकरिता १ अपर तहसीलदार, १ नायब तहसीलदार, अव्वल कारकून, ४ लिपीक, वाहनचालक व शिपाई अशा ९ पदांना मंजूरी झाल्याने परिसरातील चिचगड, ककोडी, पालांदूर (जमि.) या भागातील जनतेची होणारी पायपीट आता थांबणार आहे. नवनिर्मीत अपर तहसील कार्यालयाअंतर्गत आता अडीच जि.प. क्षेत्र व चार पंचायत समिती क्षेत्रातील गावांना याचा लाभ होणार आहे.