कंत्राटदाराला साडेचार कोटी दंडाची नोटीस

0
10

तुमसर,दि.18 : राष्ट्रीय महामार्ग बांधकामात तुमसर व मोहाडी तालुक्यात अवैध मुरुम उत्खनन करुन भराव केल्याचे पुढे आले आहे. मुरुमाची केवळ २५०० ब्रास मंजूरी असतांना २१ हजार ८०८ ब्रास मुरुम खनन केल्याचे पुढे आल्याने महसूल प्रशासनाने संबंधित कंत्राटदाराला चार कोटी ४८ लाख १६ हजार रुपये दंडाची नोटीस पाठविली आहे.

मन्सर-गोंदिया राज्यमार्गाला नुकताच राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आला आहे. त्यानंतर लगेच रस्ता बांधकामाला सुरुवात झाली. या मार्गाच्या दोन्ही बाजूला खोदकाम करुन त्यात मुरुमाचा भराव करणे सुरु आहे. या भरावाकरिता ब्रार ब्रिक प्रोजेक्ट लिमीटेड रायपूर या कंपनीने सालई खुर्द येथील गट क्र. ३१९, १, २, ३, खनिजपट्टा एक हजार ब्रास, गट क्र. ८१५ – ३, शासकीय पट्टा एक हजार ब्रास तथा टांगा येथून ५०० ब्रास मुरुमाची लीज घेतली. तीनही लीजमधून २५०० ब्रास मुरुम नियमानुसार खनन करावयाचे होते. परंतु प्रत्यक्षात २१ हजार ८०८ ब्रास मुरुम उत्खनन करण्यात आले. तसा अहवाल सालई खुर्द च्या मंडळ अधिकाऱ्याने व मोहाडी येथील सार्वजनिक बांधकामच्या उपविभागीय अभियंत्याने मोहाडी तहसीलदारांना पाठविला. तहसीलदारांनी २१ हजार ८०८ ब्रास उत्खनन केल्याप्रकरणी ४०० रुपये प्रति ब्रास दंड असे ८७ हजार २०० रुपये व त्यावर पुन्हा पाच पट दंड असा ४ कोटी ३६ लाख १६ हजार रुपये दंडाची नोटीस पाठविली आहे. यात दोन जेसीबीवर दहा लाखांचा दंड, ट्रकवर दोन लाखांचा दंड अतिरिक्त ठोठावला आहे. दंडाची एकुण रक्कम चार कोटी ४८ लाख १६ हजार रुपये आहे. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ११ जानेवारीला बारब्रिक प्रोजेक्ट लिमिटेड यांना पत्र देण्यात आले होते. सदर नोटीस मध्ये १६ जानेवारी रोजी हजर राहण्याचे नमूद केले होते. सदर प्रकरणात संबंधित कंत्राटदार महसूल प्रशासनाने नव्याने गौण खनीज खननासंदर्भातील परिपत्रकाचा आधार घेण्यासाठी धडपडत आहे.