रामझुला उड्डाणपूल टप्पा २ चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

0
20

नागपूर, दि.१९ः:- : पूर्व-पश्चिम नागपूरला जोडणाऱ्या संत्रा मार्केट येथील केबल स्टेड रामझुला रेल्वे उड्डाण पूल टप्पा २ चे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. या उड्डाण पुलामुळे नागपूरकर जनतेची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली असून या पुलामुळे रेल्वे स्टेशन येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. रामझुला  वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्व. उपक्रम) एकनाथ शिंदे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार सुधाकर देशमुख, डॉ.‍ मिलिंद माने, सुधाकर कोहळे, मनपा सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, महापालिका आयुक्त अभिजित बांगर आदी उपस्थित होते.
पूर्वीच्या १०० वर्ष जुन्या कमानी पुलाऐवजी नवीन ६ पदरी नवीन रेल्वे उड्डाण पूल बांधण्याच्या सुधारित प्रस्तावास रेल्वे विभागाने मंजुरी दिली त्यानुसार सुधारित प्रस्तावाप्रमाणे बांधकामासाठी ६९.६२ कोटी खर्च आला आहे. संत्रा मार्केट येथील ६ पदरी केबल स्टेड रेल्वे उड्डाणपुलाचे काम नागपूर शहर एकात्मिक योजनेत समाविष्ट असून रुपये ३५० कोटी खर्चाची योजना शासनाने बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्वावर मंजूर केली होती.
अशा प्रकारचे केबल स्टेड उड्डाण पूल राज्यात दोन असून त्यामध्ये वांद्रे वरळी सागरी सेतू आणि संत्रा मार्केट उड्डाण पुलाचा समावेश आहे. दोन्ही पूल रस्ते विकास महामंडळाने बांधले आहेत. या कामाचे कंत्राट मे ॲफकॉन्स इन्फ्रा. लि. मुंबई यांचे असून मे. राईटस् लि. नागपूर प्रकल्प सल्लागार व्यवस्थापक आहेत. पुलाची एकूण लांबी (पोचमार्गासह) ६०६.७४२ मीटर असून केबल स्टेड पुलाची लांबी २०० मीटर एवढी आहे. या कामाची सुधारित मंजूर किंमत ६९.६२ कोटी एवढी आहे.