अध्यात्माच्या माध्यमातून होणारा स्वच्छतेचा जागर यशस्वी करा-जगताप

0
10

भंडारा,दि.19ः-भारतीय संस्कृती ही अध्यात्मावर आधारीत आहे. अध्यात्मात समाजमन बदल घडविण्याची क्षमता आहे. अध्यात्म आणि संत साहित्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या स्वच्छतेच्या कार्याचा जागर हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. शाश्‍वत स्वच्छतेकडे वाटचाल करीत असताना ग्रामीण भागात अध्यात्माच्या माध्यमातून करण्यात येणारा स्वच्छतेचा जागर, प्रवचनकार व अधिकारी कर्मचारी यांनी लोकसहभागातून यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांनी केले.
पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन व वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र यांचे संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार्‍या स्वच्छतेचा जागर कार्यक्रमाच्या पूर्वनियोजन बैठकीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी हभप सर्जेराव महाराज देशमुख, वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष कैलास महाराज वाघाये, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) बागडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) मनिषा कुरसंगे, गट विकास अधिकारी नूतन सावंत, गट विकास अधिकारी रविंद्र वंजारी, गट विकास अधिकारी मोहोड, गट विकास अधिकारी पाटील, गट विकास अधिकारी तडस, गट विकास अधिकारी तेलंग आदींची उपस्थिती होती.
मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप म्हणाले, राज्यात व जिल्ह्यात पहिल्यांदाच संत साहित्याच्या माध्यमातून सरकारी यंत्रणेसोबत हा उपक्रम शाश्‍वत स्वच्छतेसाठी राबविण्यात येत आहे. धार्मिक कार्यातून स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्याचे काम या माध्यमातून होणार आहे. भारतीय संस्कृतीमध्ये धार्मिकतेला खूप महत्व आहे. धार्मिक व संत साहित्याचा सहभाग लाभलेल्या प्रवचनाच्या कार्यातून विद्यार्थी मनावर शाश्‍वत स्वच्छतेचे संस्कार रूजविणे सहज शक्य होईल. भंडारा जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर या उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करावी, असे निर्देश याप्रसंगी गट विकास अधिकारी यांना दिले. बैठकीला उपस्थित प्रवचनकारांनी आपल्या संत साहित्याच्या ज्ञानातून व प्रवचनाच्या माध्यमातून स्वच्छतेचा जागर ग्रामस्तरावर यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविकात माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश येरणे यांनी, भंडारा जिल्ह्याच्या सध्यास्थितीतील स्वच्छता व महाराष्ट्राच्या स्वच्छतेचा जागर या उपक्रमाची माहिती दिली. संचालन व आभार राजेश येरणे यांनी मानले.
कार्यक्रमासाठी जिल्हा कक्षाचे मनुष्यबळ विकास सल्लागार अंकुश गभने, पाणी गुणवत्ता निरीक्षक हेमंत भांडारकर, लेखाधिकारी प्रशांत फाये, डॉटा ऑपरेटर भूषण मूळे, जलस्वराज टप्पा २ चे पौर्णिमा डूंबरे, ग्रामलेखा समन्वयक वर्षा दहीकर व गट संसाधन केंद्राचे कर्मचारी यांनी सहकार्य केले.