पर्यटन विकासासाठी निधी कमी पडणार नाही

0
8

अर्जुनी मोरगाव,दि.19 : गोंदिया जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र पर्यावरणाचा बाऊ समोर करुन पर्यटन विकासात बाधा निर्माण करण्याचे काम काही प्रवृत्ती निरंतर करीत आहे. मात्र आम्ही कायदेशीर मार्ग काढून जिल्ह्याच्या पर्यटन विकास करीत राहू आणि याकरिता निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
नवेगावबांध पर्यटन स्थळ अंतर्गत रस्ता डांबरीकरण कामाच्या भूमिपूजनप्रसंगी बुधवारी (दि.१६) ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पं.स.सभापती अरविंद शिवणकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, जि.प. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एस. वैरागकर, खंडविकास अधिकारी नारायणप्रसाद जमईवार, विजय कापगते, मधुकर मरस्कोल्हे, खुशाल काशिवार, केवळराम पुस्तोडे, तंमुस अध्यक्ष महादेव बोरकर, मुलचंद गुप्ता, अण्णा डोंगरवार, चंद्रशेखर मेश्राम तसेच ग्रा.पं.चे सर्व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.
नवेगावबांध ग्रामपंचायतकरिता १०० बैठकी खुर्च्याकरिता ४ लक्ष रुपयांचा निधी देत असल्याची घोषणा याप्रसंगी ना. बडोले यांनी केली. रमाई आवास योजनेंतर्गत शत प्रतिशत लाभार्थ्यांना घर देणार असल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे छत्तीसगड राज्यात धानाला जास्त भाव तेथील सरकार देत असल्याचा माजी खासदार नाना पटोले खोटा प्रचार करीत असल्याचा आरोप याप्रसंगी बडोले यांनी आपल्या भाषणातून केला. प्रास्ताविक कार्यकारी अभियंता वैरागकर यांनी मांडले. संचालन अशोक परशुरामकर यांनी केले. आभार ग्रामविकास अधिकारी पी.आर. चव्हाण यांनी मानले.