अर्धनग्न करून १२ तरूणांच्या मारहाणीची तक्रार राष्ट्रपतींकडे

0
6

तुमसर,दि.19 : चिखला भूमिगत खाण परिसरात १२ आदिवासी तरूणांना अर्धनग्न करून मारहाण केल्याप्रकरणाची तक्रार आदिवासी कृती समितीने थेट राष्ट्रपतींकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविलेल्या निवेदनात या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.सदर प्रकरणी प्रशासनाने योग्य कारवाई केली नाही तर २३ जानेवारी रोजी जनआंदोलन करण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक उईके, काँग्रेसचे युवा नेते डॉ. पंकज कारेमोरे, माजी सरपंच तोपलाल रहांगडाले, अनिल टेकाम, वसंत बिटलाये, कमलाकर निखाडे, लक्ष्मीकांत निनावे आदी उपस्थित होते.

तुमसर तालुक्यातील चिखला व परिसरात १२ तरूण वनविभागाच्या जागेवर मार्निंग वॉक करण्यासाठी गेले होते. चिखला येथील सुरक्षा रक्षकांनी या तरूणांना ताब्यात घेवून त्यांना अर्धनग्न करून मारहाण केली. त्याचा व्हिडीओ व्हॉयरल केला. त्यामुळे त्यांची गावात, समाजात बदनामी झाली. यातील काही युवक अनुसूचित जमातीचे आहे. त्यामुळे याप्रकरणी अ‍ॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे. चिखला भूमिगत खाणीत अनेक अनियमित कामे सुरू आहेत. ती लपविण्यासाठी मॉईलच्या अधिकाऱ्यांनी निरपराध युवकांना फसविण्याचा हा केविलवाना प्रयत्न केला आहे. चिखला व डोंगरी येथील मॉईल खाणीमध्ये स्थानिक युवकांना शिकाऊ व कायमस्वरूपी नौकरी दिली नाही. आदिवासींच्या जमिनीवर मॉईलने अतिक्रमण केले आहे. डोंगरी बुजरूक व चिखला मॉईलने सुमारे ३१० एकर वनजमिनीवर अवैधरित्या डम्प केला आहे. सदर अतिक्रमण काढण्यात यावे, कमी ग्रेडचा डीओ काढला जातो व त्यांना अप्परग्रेडचा मॅग्नीज दिला जातो. येथे आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. सीएसआर अंतर्गत एनजीओ व काही अधिकारी संगणमत करून आर्थिक गैरव्यवहार करीत आहेत. कंत्राट पद्धतीने किमान मजुरी न देता कंत्राटदार व अधिकारी संगणमत करीत असल्याने या प्रकरणाची केंद्रीय गुप्तचर संस्थेमार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.खाण व्यवस्थापक आनंद चौकसे, मॉईल अभिकर्ता राजेश भट्टाचार्य, सुरक्षा अधिकारी राजू शेख, अली शाहिद, पांडूरंग कोटांगले, शिवा मुदलीयार, शत्रृघ्न चौधरी, राजेश डोंगरे यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.