गुणवाढ घोटाळा: तिघांना अटक, नऊ विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल

0
16

गडचिरोली,दि.२१:येथील गोंडवाना विद्यापीठात गुणवाढ घोटाळा उघडकीस आला असून, बेकायदेशिररित्या गुणवाढ करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. याशिवाय नऊ विद्यार्थ्यांवरही गुन्हे दाखल झाल्याने खळबळ माजली आहे.त्यामध्ये स्वप्निल बोबाटे(३२)रा.रामनगर, गडचिरोली, देवराव मेश्राम(३०), रा.सोनापूर कॉम्प्लेक्स, गडचिरोली व पवन किरणापुरे रा.पोर्ला अशी आरोपींची नावे असून, ते प्रोमार्क साफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड या संगणक संस्थेचे कंत्राटी कर्मचारी आहेत.पोलिस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार प्रकरणाचा तपास करीत आहेत

गोंडवाना विद्यापीठात सेमिस्टर पद्धतीने वर्षातून दोनदा परीक्षा घेतल्या जातात. त्यानंतर विद्यापीठात प्राध्यापकांकडून उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन केले जाते. पुढे संगणकावर विद्यापीठाच्या संबंधित अधिकाऱ्यांची डिजिटल स्वाक्षरी असलेली अंतिम गुणपत्रिका तयार करुन ती विद्यार्थ्यांना देण्यात येते. हे काम प्रोमार्क साफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले होते. यंदाही असे मूल्यांकन करण्यात आले. त्यानंतर प्रोमार्कने संगणकीय गुणपत्रिका तयार केल्या. मात्र, पडताळणी करीत असताना शंका आल्याने तपासणी करण्यात आली. तेव्हा चक्क नऊ विद्यार्थ्यांचे गुण मूळ उत्तरपत्रिकेतील गुणांपेक्षा गुणपतत्रिकेवर जास्त दाखविण्यात आल्याचे आढळून आले. पुढे कुलगुरुंच्या मार्गदर्शनाखाली चौकशी समिती गठित करण्यात आली. या समितीच्या पडताळणीत नऊ जणांना जादा गुण दाखविण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर कुलगुरुंच्या आदेशावरुन गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ.अनिल चिताडे यांनी गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीवरुन पोलिसांनी प्रोमार्क संस्थेचे तीन कर्मचारी व नऊ विद्यार्थ्यांवर भादंवि ४०६, ४६५, ४६८, ४७१, सहकलम ३४ अन्वये गुन्हे दाखल केले. त्यानंतर तिघांना शनिवारी अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांनाही २४ तारखेपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस नऊ विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत.