शहीद दिनानिमित्त मुरुमगावात उसळला जनसागर

0
11

गडचिरोली,दि.21 : अखिल भारतीय हलबा/हलबी आदिवासी समाज संघटना केंद्रीय कार्यालय कटंगी बुज जिल्हा शाखा गडचिरोली क्षेत्रीय संघटना मुरूमगाव यांच्या वतीने रविवारी गैदसिंह शहिद दिवसाचे औचित्य साधून गैदसिंह व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे अनावरण व मेळाव्याचे आयोजन मुरूमगाव येथे करण्यात आले होते. या मेळाव्याला छत्तीसगड व महाराष्ट्र राज्यातील हलबा/हलबी समाजाचे जवळपास ३० हजार नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान एन. डी. किरसान व उपस्थित मान्यवरांनी सुध्दा मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन अखिल भारतीय हलबा/हलबी आदिवासी समाज राष्ट्रीय महासभेचे उपाध्यक्ष एन. डी. किरसान यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जी. आर. राणा होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, पी. आर. नाईक, बी. एल. ठाकूर, अर्जून नाग, शिवकुमार पात्र, डॉ. देवेंद्र महल्ला, कुंवरसिंह पुजारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर, एन. के. चौधरी, शालिक मानकर, हिरालाल मांजी, किसन मानकर, माधवराव गावड, जे. टी. देहारी, श्यामलाल ठाकूर, बिरेंद्र मलिया, बुदीयारसिंह बारला, गिरवरसिंह ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुरूमगाव येथून ज्योत कलश यात्रा काढण्यात आली. यावेळी ध्वजारोहण करण्यात आले. शहीद गैदसिंह व बिरसामुंडा यांच्या प्रतिमेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाला हजारो नागरिक उपस्थित होते. मेळाव्याला छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा, बिजापूर, कोंडागाव, बस्तर, सुकमा, कांकेर, बोलाद, राजनांदगाव, दुर्ग, महासमुंद आदी २७ जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील हलबा/हलबी समाजाचे नागरिक उपस्थित होते.

मरूमगाव पोलीस मदत केंद्राचे प्रभारी पोलीस अधिकारी राजू थोरात, सचिन पोगडे यांच्या मार्गदर्शनात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. १२ गावच्या समित्यांमार्फत जेवनाची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्हा परिषद शाळा, दखणे विद्यालय, शासकीय आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
यावेळी मार्गदर्शन करताना राणा यांनी हलबा/हलबी समाजातील नागरिकांनी एकजुटतेची ताकद शासनाला दाखविली पाहिजे. आपण एकजूट होऊ तेव्हाच अन्यायाचा सामना करू शकू. दुर्गम व आदिवासी भागात वास्तव्यास असलेल्या प्रत्येक कुटुंबातील बालकाला चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळेल. यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.