तलाठ्यांना मिळणार लॅपटॉप !

0
10
  • पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या डीपीडीसी बैठकीत निर्णय  
  • डिजिटल सातबारा दुरुस्तीची प्रक्रिया होणार गतिमान

वाशिम, दि. २१ : केद्र शासनाची ‘डिजीटल इंडिया लॅन्ड रेकॉड मॉर्डननायजेशन प्रोग्राम’ अंतर्गत सातबारा बिनचूक करण्याची मोहिम सर्वत्र सुरू आहे. शेतकऱ्यांना अचूक ऑनलाईन सातबारा मिळावा, यासाठी हा सातबारा संगणकीकरण प्रक्रिया गतिमान होणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्ह्यातील तलाठ्यांना लॅपटॉप व प्रिंटर देण्याचा निर्णय १६ जानेवारी रोजी पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याकरिता ८० लक्ष रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामुळे सातबारा संगणकीकरण व डिजिटल सातबारा दुरुस्त (री-एडीट) करण्याची प्रक्रिया गतिमान होणार आहे. दुरुस्त सातबारा संबंधित तलाठ्याच्या डिजिटल स्वाक्षरीसह ऑनलाइन स्वरुपात उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असून ऑनलाईन करण्यात आलेल्या सातबाराची प्रत कोणत्याही ठिकाणहून प्राप्त करून घेणे त्यांना शक्य होणार आहे.

शेतकऱ्यांना बिनचूक डिजिटल सातबारा मिळावा, यासाठी जिल्ह्यात डिजिटल सातबारामध्ये असलेल्या चुकांची दुरुस्ती करण्यात येत आहे. याकरिता सध्या सर्व तहसील कार्यालयांमध्ये उपलब्ध संगणकांवर कामकाज सुरु आहे. या दुरुस्तीसाठी संबंधित तलाठ्याची डिजिटल स्वाक्षरी आवश्यक असल्याने संबंधित तलाठ्यांनाही तहसील कार्यालयामध्ये उपस्थित रहावे लागते. तलाठ्यांच्या संख्येच्या तुलनेत संगणकांची उपलब्धता कमी असल्याने व वेळेची मर्यादा यामुळे सातबारा दुरुस्तीचा वेग कमी आहे. तसेच तलाठ्यांना तहसील कार्यालयात उपस्थित राहून दुरुस्तीचे काम करावे लागत असल्याने त्यांच्या इतर कामांवर त्याचा परिणाम होत आहे.

डिजिटल सातबारा दुरुस्तीचे काम गतिमान होण्यासाठी तलाठ्यांना स्वतंत्र लॅपटॉप असणे आवश्यक आहे. सातबारा दुरुस्तीची प्रक्रिया गतिमान करून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील तलाठ्यांना लॅपटॉप व प्रिंटर देण्यासाठी ८० लक्ष रुपये उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालकमंत्री ना. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत घेण्यात आला आहे. लॅपटॉप उपलब्ध झाल्यानंतर तलाठ्यांना त्यांच्याच कार्यालयातून अथवा कोणत्याही ठिकाणाहून सातबारा दुरुस्तीचे काम करणे शक्य होणार आहे. तसेच कार्यालयीन कामकाजानंतर घरी सुद्धा रात्री उशिरापर्यंत या कामासाठी वेळ देता येणार आहे. दुरुस्त व अचूक सातबारा संबंधित तलाठ्याच्या स्वाक्षरीने आपले सरकार पोर्टल, महाभूलेख पोर्टलवर अपलोड केले जाणार आहेत. शेतकऱ्यांना या सातबाराची प्रिंट कोणत्याही ठिकाणहून घेणे शक्य होणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना सातबारा उताऱ्यासाठी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची आवश्यकता राहणार नाही. ‘ई-चावडी’ प्रकल्पांतर्गत टप्प्याटप्प्याने फेरफार, आठ अ उतारा यासह सर्व १ ते २१ नमुने संगणकीकृत होणार आहेत. तलाठ्यांना लॅपटॉप देण्याच्या निर्णयामुळे या कामांना गती मिळणार आहे.