२ हजार रुपयाची लाच घेणारा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात

0
12

गोंदिया,दि.२१ – पिकाची नुकसान भरपाई दिल्याचा मोबदला म्हणून २ हजार रुपयाची लाच मागणार्या वनरक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. किशोर धोंडु पटले असे अटक झालेल्या वनरक्षकाचे नाव आहे. पिकाची नुकसान भरपाई ७,३५० रुपये मिळवून दिल्याचा मोबदला म्हणून त्याने २ हजार रुपयाची लाच मागितली होती.
तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटाच्या शेतकऱ्याने खरीप हंगामात भाताचे पीक लावले होते. मात्र, ऑक्टोंबर २०१८ मध्ये त्यांच्या शेतात रान डुक्करांनी पिकाची नासधूस केली. तक्रारदार शेतकऱ्याने याबाबत तिरोडा वनक्षेत्र अधिकारी कार्यालय तक्रार केली होती. त्यांनी पिकांच्या भरपाईसाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज केला. मात्र, किशोर धोंडू पटले, वनरक्षक, बीट क्षेत्र तिरोडा यांनी शेताची पाहणी केली. त्यानंतर वनरक्षक यांनी तक्रारदारास नुकसान भरपाईची रक्कम ७,३५० रुपये काढून दिल्याचा मोबदला म्हणून २ हजार रुपयाची लाच मागतली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आलेल्या तक्रारीवरुन आज २१ जानेवारीला किशोर धोंडु पटले यांना २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. आरोपी पटले याच्यावर तिरोडा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.