सौर ऊर्जेवर धावणार प्रज्वलची सायकल

0
17

आमगाव,दि.23 : पेट्रोल-डिझेल दरवाढीने सामान्यांचे कंबरडे मोडले असताना येथील आयटीआयचा विद्यार्थी प्रज्वल चंद्रशेखर टेंभूर्णे याने सौर उर्जेवर धावणारी सायकल तयार केली आहे. भविष्यात पेट्रोल-डिझेल मर्यादीत असल्याने आणि वाढत्या प्रदूषणावर मात करून शून्य खर्चात प्रवास करता यावा या हेतूने प्रज्वलने ही सायकल तयार केली आहे.
येथील तुलसी आयटीआयमधील द्वितीय वर्षातील विद्यार्थी प्रज्वल याला लहानपनापासूनच टाकाऊपासून टिकावू वस्तू किंवा यंत्र तयार करण्याचा छंद आहे. शालेय जीवनात अनेक घडामोडींवर लक्ष ठेवून त्याने कायमस्वरुपी यंत्र तयार केले. त्यात आता सौर उर्जेवर चालणारी सायकल या त्याच्या प्रयोगाने प्रज्वलची स्वत:ची ओळख निर्माण करवून दिली आहे. सौर उर्जेवर एक तासात ३५ किमी. अंतर या सायकलने गाढता येते. तापमानात बदल घडून आल्यास पायडल मारुनही सायकल चालविता येवू शकते. ही सोलर सायकल तयार करण्यासाठी प्रज्वलने सोलर संच, सायकल, बॅटरी, कंट्रोलर, डीसी मोटार आदी साहित्यांचा वापर केला आहे.
सध्या डिझेल व पेट्रोल दर आभाळ गाठत आहेत. अशा स्थितीत सोलर सायकल निसर्गाने भेट दिलेल्या सौर ऊर्जेवर धावणार असल्याने आर्थिक बचत होणार आहे. या प्रयोगासाठी गणेश ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक विजय बहेकार यांनी आर्थिक मदत केल्याचे प्रज्वलने सांगीतले. भंडारा येथील जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयतर्फे आयोजित जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनीत सोलर सायकलचे कौतुक करुन जिल्हाधिकारी यांनी दखल घेतली.