तिरंग्या”नं दिला स्वयंरोजगार ! बांबूपासून बनवलेला तिरंगा देश-विदेशात

0
12

*प्रजासत्ताक दिन: विशेष वृत्त*

मुंबई, दि.२४:: आम्ही आमच्या हाताने तयार केलेला बांबूचा राष्ट्रध्वज आज केवळ भारतातच नाही तर विदेशात पोहोचला आहे, याचा आम्हाला गर्व आहे. भारतीय तिरंगा हा अमुचा अभिमान आहे तर तो तयार करण्याच्या निमित्ताने सुरु केलेला स्वरोजगार हा आमच्यासाठी स्वाभिमानाचा विषय आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रध्वज तयार करणारे कारागीर सर्वश्री कमलकिशोर गेडाम, अविनाश मसराम आणि अश्विनी मसराम यांनी दिली आहे. ते सांगतात, चंद्रपूर येथील बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रांतर्गत सुरु करण्यात आलेल्या बांबू हॅण्डीक्राफ्ट ॲण्ड आर्ट युनिटमध्ये बांबूपासून विविध शोभिवंत वस्तू तयार करण्याचे आम्ही प्रशिक्षण घेतले आणि स्वयंरोजगाराची वाट चोखाळली. आपल्या हातातील कौशल्याने, कलाकुसरीने आपल्या देशाचा राष्ट्रध्वज बनवताना खूप आनंद वाटतो. एक राष्ट्रध्वज बनवण्याकरिता ४ ते ५ तास लागतात.

*कृषी क्रांतीत बांबू इंडस्ट्रीला मोठे स्थान- सुधीर मुनगंटीवार*
बांबूचे उत्पादन आणि त्यावर आधारित उभ्या राहणाऱ्या इंडस्ट्रीला कृषीक्रांतीत मोठे स्थान असून यात विपूल प्रमाणात रोजगार संधी दडल्या आहेत, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, म्हणूनच आपण राज्यात बांबू धोरणाला चालना दिली आहे. कागदाच्या लगद्यापासून फर्निचरपर्यंत आणि औषधांपासून हस्तकौशल्याच्या वस्तुंपर्यंत बांबू उत्पादनांची बाजारपेठ फार विस्तृत आहे. शेती आणि कुटीर उद्योगांबरोबर औद्योगिक उत्पादनांमध्ये ही बांबूची मागणी वाढते आहे.

केंद्रात बांबूवर आधारित विविध मान्यताप्राप्त अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. मॉड्युलर एम्प्लॉएबल स्कील्स अंतर्गत बांबू प्रोसेसिंग, सेकंडरी बांबू प्रोसेसिंग, बांधकामासाठी बांबूचा उपयोग, बांबूपासून फर्निचर तयार करणे, बांबू टर्निंग प्रॉडक्ट आणि फाईन बांबू प्रॉडक्ट हे उच्च प्रकारचे प्रशिक्षणही येथे दिले जाते. बांबूला वन विभागाच्या वाहतूक परवान्यातून मुक्त केल्याने बांबू व्यवसायाची वृद्धी आता अधिक सुलभ आणि वेगाने होण्यास मदत झाली आहे. आतापर्यंत केंद्रातील विद्यार्थ्यांनी बांबूपासून गणेश मूर्ती, मोटर, सायकल, चाक तयार केले. याशिवाय फर्निचर, पेपर वेट, फ्रेम्स, मॅट्स, फुल बॉट्स, वॉल घडी, स्मृतीचिन्ह, पिशव्या देखील तयार केल्या आहेत. बीआरटीसी या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी या तीन विद्यापीठात भाऊ केंद्र सुरु करण्यात आली आहेत. आपण टाटा ट्रस्ट समवेत ही यासंबंधाने सामंजस्य करार केला आहे.

चिचपल्लीच्या बांबू संशोधन केंद्रात सध्या ५ ते ६ कारागीर बांबूचा राष्ट्रध्वज तयार करतात राष्ट्रध्वज तयार करणारे आज येथे ५० कारागिर तयार झाले आहेत या केंद्रातून बांबूपासून विविध हस्तकौशल्याच्या वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते, त्यात राष्ट्रध्वजाची निर्मिती हा एक भाग आहे. आतापर्यंत १ हजार ५०० राष्ट्रध्वजाची निर्मिती आपण केली आहे. हे तीन प्रकारचे आणि आकाराचे असतात. बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहूल पाटील यांनी माहिती दिली. ते पुढे म्हणाले, बांबू प्रशिक्षण केंद्राने आतापर्यंत १०.५ इंच आकारचा, १६.५ इंच आकाराचा आणि ७ फूट उंचीचा राष्ट्रध्वज बांबूपासून तयार केला आहे.

विशेष म्हणजे प्रशिक्षण केंद्राने तयार केलेले या तीन ही आकारातील बांबूचे राष्ट्रध्वज मंत्रालयात, विधानभवनात, संसद भवनात, राष्ट्रपती भवनात व इतर शासकीय-निमशासकीय कार्यालयात पोहोचले आहेत. याशिवाय मोझबिक, स्वीडन, चीन व सिंगापूर यासारख्या इतर देशातही पोहोचले आहेत. सात फुटाचा राष्ट्रध्वज राष्ट्रपती कार्यालय, प्रधानमंत्री कार्यालय, अर्थमंत्री अरूण जेटली यांचे कार्यालय, केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांचे कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय, राज्यपालांचे कार्यालय यांच्याबरोबरच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, चित्रपट अभिनेता अमिताभ बच्चन, यांना देण्यात आला आहे.

*राज्यातील बांबूची स्थिती*
संपूर्ण जगामध्ये बांबूच्या एकंदर १ हजार २०० प्रजाती असून त्यापैकी १२८ प्रजाती भारतामध्ये आढळतात. महाराष्ट्रात बांबूच्या २२ प्रजाती आहेत. त्यापैकी प्रामुख्याने कटांग बांबू (बांबूसा बांबूस) मानवेल (डेंड्राकॅलमस), बांबू बाल्कोवा, बांबूसा वलगारीस यासारख्या प्रजाती राज्यात आढळतात. राज्यात वनक्षेत्र ६२ हजार चौ.कि.मी आहे त्यापैकी बांबू क्षेत्र ८ हजार ४०० चौ.कि.मी आहे. राज्यातील गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यात प्रामुख्याने बांबू आढळतो. राज्यातील बांबूचे ९० टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादन गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात होते. बांबूच्या उत्पादनात वाढ करणे, बांबू जंगलाची उत्पादकता वाढवणे व त्याच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. बांबूवर आधारित पारंपरिक व आधुनिक उद्योगाला चालना देणे, जंगलात तसेच खासगी क्षेत्रात दर्जेदार बांबू प्रजातींची लागवड करणे याकरिता महाराष्ट्र बांबू विकास मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.