विदर्भ कुस्तीची पंढरी होईल – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

0
17

वर्धा,दि. ३०: आपल्या देशात प्राचीन काळापासून कुस्ती या खेळाला राजाश्रय होता, मात्र अलीकडच्या काळात कुस्तीला राजाश्रय कमी पडला. खासदार रामदास तडस यांच्यासारख्या कुस्तीवर प्रेम करणाऱ्या नेत्यांनी विदर्भात कुस्तीला रुजविण्यासाठी घेतलेला पुढाकार हा एक दिवस विदर्भाला कुस्तीची पंढरी केल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन वित्त व नियोजनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
देवळी येथे नगर परिषद प्रांगणात आयोजित महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, वर्धा कुस्तीगीर परिषद आणि सार्वजनिक बजरंग व्यायाम शाळेच्या वतीने आयोजित २१ वी वरिष्ठ महिला व तिसरी सब ज्युनियर महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ, राज्य शासन वैशिष्ट्यपूर्ण निधी मधून बांधण्यात आलेल्या नवीन स्टेडीयमचे लोकार्पण आणि वैशिष्ट्यपूर्ण निधीतून १० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन, शाहिद स्मारकाचे लोकार्पण कार्यक्रम पार पडला, यावेळी श्री. मुनगंटीवार बोलत होते. या समारंभाला खासदार रामदास तडस, आमदार रामदास आंबटकर, देवळीच्या नगराध्यक्ष सुचिता मडावी, राज्य कृषी मूल्य आयोगाचे सदस्य प्रशांत इंगळे, शोभा तडस, नांदगाव खंडेश्वरचे नगराध्यक्ष संजय पोकळे, सुनील गफाट आदी उपस्थित होते.
खेलो इंडियाच्या माध्यमातून देशात खेळाचे वातावरण आणि खेळाडू तयार करण्याचे प्रयत्न होत आहेत. देशाची खेळातील प्रगती पाहता पुढील दहा वर्षांत ऑलिम्पिकमध्ये सर्वात जास्त पदके मिळविण्यात आपला देश दुसऱ्या क्रमांकावर राहिल यात शंका नाही, असे श्री मुनगंटीवार म्हणाले. चंद्रपूरसारख्या जिल्ह्यातील आदिवासी मुले – मुली २९ हजार फूट उंचीवर आपला तिरंगा फडकवण्याची कामगिरी करतात. याचा अर्थ विदर्भातही चांगले खेळाडू घडविण्याची शक्ती आहे. अशा स्टेडियमच्या माध्यमातून विदर्भात उत्तम खेळाडू तयार होतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. कुस्तीसाठी इनडोअर स्टेडियमसाठी ५ कोटी रुपये निधी देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. या निधीतून उत्कृष्ट इनडोअर स्टेडियम तयार करावे. तसेच कुस्ती व कबड्डीची मॅट खरेदी करण्यासाठी सुद्धा १४ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची हमी त्यांनी यावेळी दिली. या स्टेडियमच्या माध्यमातून विविध खेळाचे खेळाडू तयार होतील. कुस्ती खेळणाऱ्या मुलींसाठी वित्तमंत्री म्हणून काही करता आले तर यासारखा दुसरा आनंद असणार नाही. कुस्तीच्या प्रचार- प्रसारासाठी काम करणारा नेता म्हणून खासदार तडस यांची ओळख आहे. ती ओळख त्यांनी अशीच कायम ठेवावी अशा शुभेछा त्यांनी यावेळी दिल्यात. तसेच विविध जिल्ह्यातून आलेल्या कुस्तीगीरांना त्यांनी उत्कृष्ट खेळ करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सांघिक विजेतेपद मिळविणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याला ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सब ज्युनियर मुलींच्या कुस्ती स्पर्धेत पुणे जिल्ह्याला सांघिक विजेतेपदाची ट्रॉफी देण्यात आली. खासदार तडस म्हणाले, खेळाडूला जात पात, धर्म नसतो. तो केवळ देशासाठी खेळतो आणि दे

शाचे नाव उज्ज्वल करतो. देवळीला यापूर्वी कुस्तीचा आखाडा नव्हता. आता नवीन स्टेडीयमच्या माध्यमातून इथे इनडोअर आखाडा करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी निधीची मागणी त्यांनी वित्तमंत्र्यांकडे केली. महाराष्ट्रात मुली कुस्ती खेळायला लागल्या असून आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये त्या उत्तम कामगिरी करत आहेत. या स्टेडीयमच्या माध्यमातून कुस्तीच प्रशिक्षण केंद्र वर्धेत तयार करण्याचा मानस असून विदर्भात कुस्तीचे खेळाडू तयार करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सार्वजनिक बजरंग व्यायामशाळेचे व्यवस्थापक पंकज तडस यांनी केले. संचालन पंकज चोरे, दीपक फुंडकर, आभार नगर परिषद उपाध्यक्ष नरेंद्र मदनकर यांनी केले. कार्यक्रमाला राणा रणनवरे, पंकज सायंकार, मयुरी सयाम, विद्या भुजाडे, किशोर गव्हाळकर इत्यादी मान्यवरांसह खेळाडू, प्रशिक्षक, नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.