महिला मतदार नोंदणीसाठी विशेष प्रयत्न करा-विभागीय आयुक्त पीयूष सिंह

0
19
  • लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पूर्वतयारीचा आढावा

वाशिम, दि. ३१ : मतदार यादीनुसार जिल्ह्यातील ज्या मतदान केंद्राच्या क्षेत्रात स्त्री-पुरुष मतदारांचे गुणोत्तर हे जिल्ह्याच्या सरासरीच्या तुलनेत कमी आहे, अशा ठिकाणी स्वीप कार्यक्रम प्रभावीपणे राबवून पात्र महिला मतदारांची नावे मतदार यादीत नोंदविण्याची कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पूर्वतयारी आढावा बैठकीत दिल्या.यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, निवासी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश हिंगे, प्रभारी पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक पवन बनसोड, उपविभागीय अधिकारी शरद जावळे, धनंजय गोगटे, अभिषेक देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदा पराजे, रमेश सोनुने यांची उपस्थिती होती.

श्री. सिंह म्हणाले, महिला मतदारांची नावे मतदार यादीत नोंदविण्यासोबतच जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मतदान ओळखपत्र व मतदार यादीमध्ये ज्यांची छायाचित्रे नाहीत, ती प्राप्त करून घेण्यासाठी व नवमतदार नोंदणीसाठी प्रयत्न करावेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आवश्यक मनुष्यबळ, वाहन व्यवस्था याचे नियोजन योग्य पद्धतीने केले जावे. तसेच सर्व मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करावी. ज्या मतदार केंद्रांवर कनेक्टीव्हिटी नाही, अशा ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्यासाठी संबंधित सर्व सर्व्हिस प्रोव्हायडरची बैठक घेवून चर्चा करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनविषयी जिल्ह्यात सुरु असलेल्या जनजागृती मोहिमेचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला. तसेच लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध पथके तयार करणे, जिल्हा संपर्क कक्ष, कायदा व सुव्यवस्था, मतदान केंद्रांवर उपलब्ध असलेल्या सुविधा आदी विषयांचाही यावेळी आढावा घेण्यात आला.

जलसंधारणाच्या कामांना गती द्याविभागीय आयुक्त पीयूष सिंह

वाशिम, दि. ३१ : राज्य शासन व भारतीय जैन संघटना अर्थात बीजेएसच्या यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार जिल्ह्यात जलसंधारणाची कामे सुरु आहेत. याकामासाठी बीजेएसने २८ जेसीबी व  १३ पोकलॅन मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. या मशीनद्वारे जिल्ह्यात जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे होणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी या कामांना गती देण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, कृषि सहसंचालक सुभाष नागरे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा रोहयोचे उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, बीजेएसचे जिल्हा समन्वयक शिखरचंद बागरेचा, तालुका कृषि अधिकारी अभिजित देवगिरीकर, संतोष वाळके, सचिन कांबळे आदी उपस्थित होते.