माजी आमदार बापूराव पाटील आष्टीकर यांचे निधन

0
43

नांदेड, दि.५ : हदगावचे माजी आमदार तसेच शिवसेना आ. नागेश पाटील आष्टीकर यांचे वडील बापूराव पाटील आष्टीकर (वय ९०) यांचे सोमवारी (दि.४) सकाळी ९ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. मंगळवारी (दि.५) सकाळी ११ वाजता आष्टी, ता. हदगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्यामागे पत्नी, शिवसेनेचे आमदार नागेश पाटील आष्टीकर व दिनेश ही दोन मुले, माजी जि. प. सदस्या इंदूबाई कदम, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुरेखा कदम, लता शिनगारे, स्मिता पाटील या चार मुली, नातू, पणतू असा परिवार आहे. सेवानिवृत्त सहायक पोलिस आयुक्त गोपीनाथ पाटील, नांदेड जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी व सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक अशोक शिनगारे, नांदेडचे सुभाष कदम यांचे ते सासरे होत.

बापुराव पाटील आष्टीकर हे हदगाव पंचायत समितीचे सलग १७ वर्ष सभापती होते, नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व वसंत सहकारी साखर कारखाना म. पोफाळीचे चेअरमन होते.1985 ते 95 अशी सतत १० वर्ष हदगाव मतदारसंघाचे आमदार होते. हदगाव-हिमायतनगर तालुक्यातील विशेषतः ग्रामीण भागातील मुला-मुलींना शिक्षणाची सोय व्हावी या उद्देशाने हदगाव येथे हदगाव तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची १९९० या वर्षात स्थापना करून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यवस्था करून दिली.

हदगाव येथे श्री दत्त कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयासह हिमायतनगर, हरडफ, तामसा आदी गावांमध्ये त्यांनी शाळा, महाविद्यालय उघडत ग्रामीण भागातील विद्यारथ्यांना शिक्षणाची दारे उघडी करून दिली. राजकारणातील दुरदृष्टी नेते म्हणून ते गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत त्यांची ओळख होती.

अतिशय मनमिळाऊ आणि स्वपक्षीयांसह विरोधी पक्षातील नेते,कार्यकर्ते यांच्याशी ते जिव्हाळ्याचे संबंध जोपासुन होते. वयाच्या नव्वदीतही ते कालपर्यंत ते आपल्या आष्टी (ता.हदगाव) या गावाकडील शेताकडे जाऊन पिकांकडे लक्ष देत असत.आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी कधीच आरामदायी जीवन न जगता सतत कामात आणि समाजसेवेत त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते. एक अभ्यासू आणि जनसेवेचा वसा घेतलेले मराठवाड्याचे ढाण्या वाघ म्हणून सर्वदूर परिचित असलेले माजी आमदार बापुराव पाटील आष्टीकर यांच्या जाण्याने सर्वच राजकीय क्षेत्रातील दिग्गजांना धक्का बसला आहे.

मान्यवरांनी घेतले अंत्यदर्शन
सोमवारी निधनाचे वृत्त कळताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, आ.प्रताप पाटील चिखलीकर,आ.डी. पी.सावंत, आ.अमर राजूरकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, सौ. राजश्री हेमंत पाटील,माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर,उपविभागीय अधिकारी महेश वडदकर, तहसीलदार किरण अंबेकर यांनी नांदेडच्या आश्विनी रुग्णालयात जाऊन माजी आमदार बापुराव पाटील आष्टीकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.