शहीद जवान नितीन राठोड यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

0
22

• माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजीराव पाटील- निलंगेकर यांनी वाहीली श्रद्धांजली
• साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
बुलडाणा, दि 16 : शहीद जवान नितीन राठोड अमर रहे.. अमर रहे.. शहीद जवान अमर रहे, भारत माता की जय.. वंदे मातरम.. या घोषणांनी गोवर्धन नगरचे वातावरण देशभक्तीमय झाले. जम्मू व काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांच्या वाहन ताफ्यावर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात गोधर्वन नगर, ता. लोणार येथील नितीन शिवाजी राठोड जवान शहीद झाले होते. त्यांच्या पार्थिवावर आज १६ फेब्रुवारी २०१९ रोजी त्यांच्या मूळ गावी गोवर्धन नगर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात पत्नी श्रीमती वंदना शिवाजी राठोड वय 30 वर्ष, मुलगा चि. जीवन वय 10 वर्ष व मुलगी कु. जिविका वय 5 वर्ष, आई सौ सावित्रीबाई वय 53 वर्ष, वडील शिवाजी रामू राठोड वय 58 वर्ष, दोन बहीण आणि एक भाऊ प्रविण राठोड वय 32 वर्ष असा परिवार आहे.
गोवर्धन नगर येथील आश्रम शाळेच्या प्रांगणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्याचे माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजीवराव पाटील – निलंगेकर, विधानसभा विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधव, आमदार सर्वश्री डॉ. शशिकांत खेडेकर, डॉ. संजय रायमूलकर, राहुल बोंद्रे, हर्षवर्धन सपकाळ, जि.प सभापती श्वेताताई महाले, सिं.राजा शहराचे नगराध्यक्ष नाझेर काझी, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे आदींनी शहीद जवान नितीन राठोड यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहीली. याप्रसंगी माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शहीद नितीन राठोड यांच्या कुटूंबीयांचे सांत्वन केले व राज्य शासनाने जाहीर केलेल्या ५० लक्ष रूपये आर्थिक मदतीचा धनादेश कुटूंबीयांना सुपूर्द केला. शहीद जवान यांना केंद्रीय राखीव पोलीस दल व पोलीसांच्या तुकडीने हवेत बंदूकीने तीन फैरी झाडून आदरांजली दिली.
शहीद जवान नितीन राठोड यांचे पार्थिव आज विशेष विमानाने औरंगाबाद येथे आणण्यात आले. औरंगाबाद येथून रस्ता मार्गे त्यांच्या मूळ गावी आणून गावातून पार्थिवाची मिरवणूक काढण्यात आली. निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. संपूर्ण गाव यावेळी शोकाकूल झाले होते. गावकऱ्यांनी भावूक वातावरणात साश्रूनयनांनी शहीद नितीन राठोड यांना अखेरचा निरोप दिला. अंत्यसंस्काराला लोकप्रतिनिधी, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अधिकारी, विविध शासकी विभागांचे अधिकारी, नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.