उपशिक्षणाधिकारी चलाख हटावकरीता शिक्षक संघटनांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा

0
16

गडचिरोली,दि.17ः- जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था व्यवस्थित राखण्यासाठी उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) मारोती चलाख यांच्यावर त्वरित कारवाई करून त्यांचे इतरत्र स्थानांतरण करावे या मागणीसाठी आज १६ फेब्रुवारी रोजी सर्व शिक्षक संघटनांच्यावतीने जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, तालुकास्तरीय शालेय बालक्रीडा व कला संमेलन गडचिरोली व्दारा आयोजित गिलगाव येथील उद््घाटनीय सोहळय़ात उपशिक्षणाधिकारी मारोती चलाख यांनी व्यासपीठावरून ‘शिक्षक फुटकचा पगार घेतात, विद्यार्थ्यांना शिकवित नाही, मी कोणत्याही शिक्षकाला सोडणार नाही, एकेकाला पाहून घेईन’ असे धमकीवजा भाष्य करून शिक्षक संवर्गाचा जाहीररित्या अपमानकारक वक्तव्य करून अपमान केला आहे. उपशिक्षणाधिकारी चलाख यांच्या जाहीर वक्तव्याचा आम्ही सर्व संघटनांच्यावतीने निषेध नोंदवित असून न्याय मागणीस्तव जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना एकत्रितपणे उपशिक्षणाधिकारी चलाख यांच्या अनुचित वक्तव्याच्या निषेधार्थ १५ जानेवारी रोजी निषेध आंदोलन करण्यात आले होते. या निषेध आंदोलनाची दखल घेवून खा. अशोक नेते, जि.प. अध्यक्ष, सीईओ, आ. डॉ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे, जि.प. उपाध्यक्ष यांनी १६ जानेवारीला जि.प. अध्यक्षांच्या दालनात सभा आयोजित करून उपशिक्षणाधिकारी चलाख यांचे स्थानांतरण करण्याची हमी दिली होती. मात्र अद्यापही चलाख यांचे पदावरून इतरत्र स्थानांतरण केलेले नाही. त्यामुळे शिक्षक संवर्गात प्रशासनाप्रती असंतोष पसरलेला आहे. चलाख यांच्यावर त्वरित कारवाई करून त्यांचे स्थानांतरण करण्यात यावे, अशी मागणी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली.
मोर्चात मराप्राशि समितीचे अध्यक्ष धनपाल मिसार, मराप्राशि संघाचे अध्यक्ष रघुनाथ भांडेकर, जि.प. कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र डोहणे, मराप्राशि परिषदेचे अध्यक्ष प्रमोद खांडेकर, मरा जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अध्यक्ष गुरूदेव नवघडे, पदविधर शिक्षक सभेचे अध्यक्ष यशवंत जांभुळकर, दुर्गम क्रांती संघटनेचे अध्यक्ष कुरवटकर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.