महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमात महिलांचाच अपमान-देवानंद पवार यांचा आरोप

0
20

यवतमाळ,दि.17(विशेष प्रतिनिधी) : काश्मिरातील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर भ्याड हल्ला केल्याने ४४ सैनिक शहिद झाले. या घटनेने देशभरात शोककळा पसरली. एवढे मोठे संकट राष्ट्रावर आले असतांना त्यावर उपाययोजना करून पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यात यावे अशी देशवासीयांची भावना होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हि गोष्ट दुर्लक्षीत करून पांढरकवडा येथिल महिला बचतगटाच्या सभेला उपस्थित राहिले. हि अत्यंत निषेधार्ह गोष्ट असून देशाच्या पंतप्रधानांकडून अशा बेजबाबदार वागण्याची अपेक्षा नव्हती असे प्रतिपादन महाराष्ट्र किसान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (विदर्भ) देवानंद पवार यांनी पत्रकार परिषदेत केले. या सभेसाठी उपस्थित असलेल्या अनेक महिलांचे सोन्याचे मंगळसुत्र चोरीला गेल्याच्या तक्रारी आहेत. चौकीदारच चोर असल्याने या घटना अपेक्षीतच होत्या असा टोला देवानंद पवार यांनी लगावला. पत्रकार परिषदेला महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष माधुरीताई अराठे, कॉंग्रेस अनुसूचित जाती सेलचे यवतमाळ अध्यक्ष सुनिल भेले, कॉंग्रेस शहराध्यक्ष चंद्रशेखर चौधरी, सरचिटणीस किरण कुमरे, प्रदिप डंभारे, उमेश इंगळे, घनश्याम अत्रे उपस्थित होते.
एकीकडे दिल्लीमध्ये सरकारने या संकटाबाबत विचारविनीमय करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलविलेली होती. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अशा प्रसंगी विरोधी पक्ष सरकारच्या कायम पाठिशी असल्याची अत्यंत जबाबदार भुमिका घेतली. मात्र पंतप्रधानांनी या बैठकीला पाठ दाखवून शासकीय पैशाने प्रचारसभा घेण्याला प्राधान्य दिले. या हल्ल्यात शहिद जवानांचे पार्थिव त्यांच्या परिवाराकडे सोपविल्या जाण्याच्या आधी देशाचे पंतप्रधान सभा घेतात अशी घटना बहुतेक प्रथमच घडत आहे. पांढरकवड्यात घेण्यात आलेला शासकीय कार्यक्रम २०-२५ दिवस समोर लोटला असता तरी चालले असते. मुळात पांढरकवडा येथे येऊन त्यांनी आपली राजकीय पोळी शेकण्याचाच प्रयत्न केला. हा शासकीय कार्यक्रम होता. मात्र सभास्थळी चारही बाजुंनी भारतीय जनता पार्टीचे झेंडे लावलेले होते. सर्वात उल्लेखनिय गोष्ट म्हणजे महिला सक्षमीकरणाच्या गप्पा या कार्यक्रमात करण्यात आल्या. परंतु व्यासपीठावर एकाही महिलेला स्थान देण्यात आले नाही. प्रोटोकॉल नुसार पांढरकवडा शहराच्या नगराध्यक्षा वैशाली नहाते यांना व्यासपीठावर स्थान देणे आवश्यक होते. मात्र स्वपक्षाच्या नगराध्यक्ष नसल्याने कार्यक्रम पत्रिकेत सुद्धा त्यांच्या नावाचा उल्लेख नव्हता. त्यामुळे पंतप्रधानांचे महिला सक्षमीकरण पोकळ असल्याचा आरोप देवानंद पवार यांनी यावेळी केला.
याच कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखिल शेतकरी कर्जमाफी विषयी अत्यंत खोटे दावे केले. अजुनही लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. मात्र तरी देखील मुख्यमंत्र्यांनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली. या कार्यक्रमाला येण्यासाठी महिलांना शासकीय योजनांचे आमिष दाखवून आणल्या गेले. त्यामुळे अनेक महिला पंतप्रधानांचे भाषण सुरू असतांना उठून गेल्या असे पवार यांनी सांगितले. जबाबदार विरोधी पक्ष या नात्याने कॉंग्रेस सरकारच्या पाठीशी आहे. अशा कठिण प्रसंगी पंतप्रधानांनी देशाच्या राजधानीत बसून पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी निर्णय घ्यायला हवे होते. पंतप्रधानांच्या दुर्लक्षामुळे पुन्हा तिन हल्ले झाले. तर बॉम्ब निकामी करतांना एक मेजर शहिद झाले.
महत्वाचे म्हणजे एकीकडे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात दोन शहिद सैनिकांचे प्रेत जळत होते तर त्याच विदर्भातील जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या पोकळ योजनांच्या गप्पा हाकत होते. किमान मोदींनी सभेनंतर तरी त्या शहिदांच्या अंत्यविधीला उपस्थिती लावली असती तर त्यांच्या विषयी सन्मान वाटला असता. मात्र या घटनेमुळे पंतप्रधान व भारतीय जनता पक्षाचा खोटा राष्ट्रवाद उघड पडला आहे. जसे रोम जळत असतांना निरो फिडेल वाजवत होता तसेच यावेळी सैनिकांचे प्रेत जळत असतांना पंतप्रधान मोदी गप्पा हाकत होते अशी बिकट परिस्थिती देशात निर्माण झाली आहे असे पवार यावेळी म्हणाले.