देसाईगंजमधील पोलिस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

0
17

गडचिरोली,दि.१८: मारहाणीच्या प्रकरणात तक्रारकर्त्यावर दाखल अदखलपात्र गुन्ह्यात प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी तक्रारकर्त्याकडून पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी देसाईगंज पोलिस ठाण्यातील हवालदारास रंगेहाथ अटक केली. नरेंद्र यादवराव खेवले (४९)वर्ग-३, असे आरोपीचे नाव आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ता हा देसाईगंज येथील रहिवासी असून, शेती व मजुरीचे काम करतो. यंदा त्याने उसेगाव येथे आपल्या आईच्या नावावर असलेल्या अडीच एकर शेतातील काही भागात पोपटीच्या बियाण्यांची पेरणी केली होती. परंतु शेंगा परिपक्व झाल्यानंतर तक्रारकर्त्याच्या मोठ्या भावाने त्या तोडल्या. यावरुन दोन भावांमध्ये वाद झाला. त्यानंतर मोठ्या भावाने तक्रारकर्त्याला मारहाण करुन पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर हवालदार नरेंद्र खेवले हा तक्रारकर्त्याच्या घरी गेला.  त्याने ‘तुझ्यावर पोलिस ठाण्यात शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यासाठी पोलिस ठाण्यात यावे लागेल’, असे म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी तक्रारकर्त्यास १ हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती तो पाचशे रुपये स्वीकारण्यास तयार झाला.मात्र, लाच देण्याची तक्रारकर्त्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने गडचिरोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आज सापळा रचून हवालदार नरेंद्र खेवले यास तक्रारकर्त्याकडून पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्याच्यावर देसाईगंज पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एसीबीचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुधलवार, उपअधीक्षक विजय माहुलकर, डी.एम.घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रवी राजुलवार, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, हवालदार प्रमोद ढोरे, सुधाकर दंडिकवार, देवेंद्र लोनबले, तुळशीराम नवघरे, स्वप्नील वडेट्टीवार, सोनी तावाडे, सोनल आत्राम आदींनी ही कारवाई केली.