छत्रपती शिवाजी महाराज : एक आदर्श प्रशासक

0
181

छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनचरित्र केवळ महाराष्ट्र किंवा भारतातीलच नव्हे, तर जगभरातील अभ्यासक,  प्रशासक आणि विविध क्षेत्रांत काम करणा-या नागरिकांना कायम प्रेरणादायी ठरणारे आहे.

छत्रपती शिवराय हे महान योद्धा, धाडसी सेनापती असण्याबरोबरच स्वराज्याचे संस्थापक, तसेच सुजाण प्रशासक व द्रष्टे राष्ट्रनिर्माता होते.  महाराष्ट्राच्याच नव्हे समस्त भारतवर्षाच्या इतिहासात शिवरायांचे जीवन देदिप्यमान व अनन्यसाधारण ठरणारे आहे. एका आदर्श प्रशासकाला आवश्यक असणारे शिस्त, जोखीम स्वीकारण्याचे धाडस,न्याय, दूरदृष्टी, विवेक, अखंड परिश्रम हे सर्व गुण त्यांच्या ठायी होते.

स्वराज्यनिर्मिती आणि न्यायी राज्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी सर्व जातीधर्मांतील नागरिकांना एकत्र करून आपले सैन्य उभे केले. आपल्या सहका-यांमध्ये कुठल्याही भेदाभेदाला थारा दिला नाही. त्यामुळे या थोर राजाच्या शब्दांबरहुकूम स्वराज्यनिर्मितीसाठी आपले प्राण त्यागण्याची तयारी असणारे अनेक लढवय्ये व शूर सहकारी निर्माण झाले. त्यातून एक शिस्तबद्ध संरक्षण व्यवस्था उभी राहिली.

मुत्सद्दी राजा

सुरुवातीला अत्यल्प सैन्य असूनही गनिमी काव्याचा नियोजनबद्ध वापर करून त्यांनी शत्रूच्या विशाल सैन्याला नामोहरम केले. त्यांनी जिंकलेल्या लढाया त्यांच्या यशस्वी युद्धनीती आणि मुत्सद्दीपणाची साक्ष देतात. योग्य त्या वेळी आक्रमण किंवा गरज पडेल त्यावेळी तह हे सूत्र मुत्सद्दीपणे त्यांनी वापरले व अनेक शत्रूंना नामोहरम केले.स्वराज्यासाठीच्या लढाईत कुठेही फितुरी, दगाबाजी होणार नाही, यासाठी कडक शिस्त निर्माण केली. स्वराज्यांतर्गत कलह वेळीच मोडून काढला. भूगोल अर्थात भूप्रदेशाचे अचूक ज्ञान, आश्चर्यजनक वेगवान हालचालींसाठी सैन्याची काटेकोर रचना आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले या सूत्राच्या आधारे त्यांनी अनेक लढाया जिंकल्या.त्यांची प्रत्येक लढाई ही संरक्षणशास्त्राच्या संशोधकांसाठी अभ्यसनीय आहे.

शिस्त, कर्तृत्ववानांचा सन्मान, न्याय व समानतेची वागणूक या नेतृत्वगुणांमुळे सैन्याबरोबरच तत्कालीन प्रजेच्या मनातही छत्रपती शिवरायांबद्दल आदर निर्माण झाला.त्यामुळे त्यांची प्रत्येक मोहिम यशस्वी ठरत गेली.  शिवरायांनी रयतेच्या मनामध्ये स्वाभिमानाचा, पराक्रमाचा, स्वराज्यनिष्ठेचा हुंकार जागृत केला.

अष्टप्रधान मंडळ

राज्याच्या कारभाराची घडी बसविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना करून स्वराज्याच्या राज्यकारभाराची परिपूर्ण व्यवस्था निर्माण केली.त्यांनी स्वराज्याची राजमुद्रा स्थापित केली. ‘प्रधान अमात्य सचिव मंत्री, सुमंत न्यायाधीश धर्मशास्त्री, सेनापती त्यात असे सुजाणा, अष्टप्रधानी शिवमुख्य राणा’ असे या अष्टप्रधान मंडळाचे वर्णन केले जाते. राज्यकारभाराची निरनिराळी कामे त्यांनी या मंत्र्यांकडे सोपवली होती. सहका-यांची निवड करताना त्यांनी कर्तबगारी व गुणांचा गौरव केला.

 न्यायी राजा

एक न्यायी राजा म्हणून छत्रपती शिवरायांचे कर्तृत्व जगभरातील समस्त प्रशासकांसाठी प्रेरणादायी आहे. राजा किंवा प्रशासक हे प्रजेचे सेवक असतात, ही उच्च भावना बाळगून त्यांनी राज्यकारभार केला. आपल्या अधिपत्याखालील प्रदेशात त्यांनी उत्तम पद्धतीची शासन व्यवस्था व शांतता निर्माण केली. शेतकरी वर्गाच्या हितावह धोरणे आखली. नागरिकांना आवश्यक सुरक्षितता  मिळवून दिली. शेतक-यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये ही त्यांची आज्ञा आजही एका आदर्श प्रशासकाचे वचन म्हणून सुवर्णाक्षरांत कोरली गेली आहे. त्यांच्या उदार, सहिष्णू व लोककल्याणकारी धोरणांमुळे त्यांनी सामान्य रयतेच्या, शेतक-यांच्या, लढवय्या सैनिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले. शिवराय हे सहिष्णू राजा होते. त्यांनी सर्व जातिधर्माच्या संतांचा सन्मान केला.

भक्कम नौदलाची उभारणी

सागरी प्रदेशाचे महत्व ओळखून त्यांनी आरमारी दलाची उभारणी केली. स्वराज्याच्या सैन्याकडे आधुनिक शस्त्रे असावीत, म्हणूनही त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी उभारलेले गडकिल्ले त्यांच्या विशाल कार्याची साक्ष देतात. शिवरायांनी स्वत:चे भक्कम नौदल उभारून कोकणभूमीच्या किनारपट्टीवर अनेक अभेद्य जलदुर्गांची निर्मिती केली. या भक्कम नौदल व जलदुर्गांच्या निर्मितीने त्यांनी जंजिरेकर सिद्दीबरोबरच पोर्तुगीज, इंग्रज, डच यांसारख्या आधुनिक युरोपीय सत्तांवर जरब बसवली व  स्वराज्याचे रक्षण केले. शौर्य,पराक्रम,  ध्येयवाद, कुशल संघटन, कडक व नियोजनबद्ध प्रशासन, मुत्सद्दीपणा, धाडस, द्रष्टेपणा असे उच्च कोटीचे गुण महाराजांच्या व्यक्तिमत्त्वात होते. राज्यकारभाराची निरनिराळी कामे त्यांनी या मंत्र्यांकडे सोपवली होती. त्यामुळे एक आदर्श राज्यवस्था निर्माण झाली. त्यामुळेच आजही जगभरातील अभ्यासकांकडून या आदर्श व न्यायी राजाचा गौरव केला जातो.

– हर्षवर्धन पवार,जिल्हा माहिती अधिकारी, अमरावती