इतवारी- गोंदिया मेमू गाडीचा बालाघाट पर्यंत विस्तार

0
28

गोंदिया,दि.20 : गोंदिया-इतवारी दरम्यान धावणाऱ्या मेमू रेल्वे गाडी (क्रमांक ६८७१४-६८७१५) आता शेजारील मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट पर्यंत विस्तारीत करण्यात आली आहे. येत्या शुक्रवारपासून (दि.२२) ही गाडी प्रवाशांच्या सेवेत सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, ही गाडी बालाघाटवासीयांसाठी वरदानच ठरणार असून बालाघाटवासियांना नागपूरसाठी सरळ रेल्वेगाडी मिळाली आहे.मात्र गोंदिया स्थानकातून नागपूरसाठी सुटणारी एकही गाडी या स्थानकात राहिली नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.बालाघाटचे खासदार बोधसिंग भगत हे ही गाडी बालाघाटवरुन सुरु व्हावी यासाठी गेल्या अनेक दिवसापासून रेल्वेविभागाकडे पाठपुरावा करीत होते.त्यांच्या प्रयत्नाना यश आले आहे.तर दुसरीकडे मात्र गोंदियावासियांना निराशा पदरी आली आहे.
येथील स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ७ येथून दुपारी ३.१० वाजता सुटणारी गाडी सायंकाळी इतवारी येथे पोहचत होती व तेथून परत गोंदियाला येत होती. ही गाडी आता बालाघाट येथून दुपारी ३.१५ सुटणार व गोंदिया येथे ४.१५ वाजता पोहचेल. तर गोंदियाहून इतवारीसाठी ४.२० वाजता रवाना होणार. इतवारी स्थानकावर या गाडीची वेळ सायंकाळी ६.२५ निर्धारीत करण्यात आली आहे. इतवारीहून गाडी क्रमांक ६८७१४ सकाळी १०.३५ वाजता गोंदिया-बालाघाट साठी सुटेल. गोंदियात ही गाडी दुपारी २ वाजता पोहचून गोंदियाहून दुपारी २.०५ वाजता सुटून ३.१५ वाजता बालाघाट पोहचणार आहे.