वाहनधारकांनो, थकीत पर्यावरण कर भरा

0
16
  • परिवहन विभागाकडून कारवाईचा इशारा
  • स्पीड गव्हर्नर तातडीने बसविण्याचे आवाहन

वाशिम, दि. २० : परिवहन संवर्गातील वाहनांना स्पीड गव्हर्नर बसविणे आवश्यक असून अद्याप ज्या वाहनधारकांनी आपल्या वाहनांना स्पीड गव्हर्नर बसविलेला नाही, अशा वाहनधारकांनी स्पीड गव्हर्नर बसवून आपले योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करून घ्यावे. तसेच वाहनांचा विमा नियम विधीग्राह्य ठेवावा. परिवहन व परिवहनेतर (खाजगी) वाहनांना १५ ऑक्टोंबर २०१० पासून लागू करण्यात आलेला थकीत पर्यावरण कर भरावा. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

पाच वर्षांकरिता मोटार सायकलसाठी २ हजार रुपये, कार, जीप (पेट्रोल)साठी ३ हजार रुपये, डीझेल जीपसाठी ४ हजार रुपये, हलक्या मालवाहू वाहनाला २ हजार ५०० रुपये, ऑटोरिक्षाकरिता ७५० रुपये तसेच ट्रक जडवाहनांना प्रत्येक वर्षाकरिता वार्षिक कारच्या १० टक्के आणि बससाठी प्रत्येक वर्षी वार्षिक कारच्या २.५ टक्के पर्यावरण कर लागू आहे. तसेच परिवहन संवर्गातील वाहनांना ८ वर्षानंतर वाहनाच्या प्रकार व वजनानुसार पर्यावरण कर भरणे आवश्यक आहे. तरी ज्या वाहनांचा पर्यावरण कर थकीत आहे, अशा वाहनांवर दंडाची अथवा वाहन अटकवून ठेवण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.