२३ व २४ फेब्रुवारी रोजी विशेष मतदार नोंदणी मोहीम

0
17
  • पात्र मतदारांना नाव नोंदणीची संधी

वाशिम, दि. २० : अद्याप मतदार यादीत नाव न नोंदविलेल्या पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविता यावे, याकरिता २३ व २४ फेब्रुवारी २०१९ रोजी सर्व मतदान केंद्र स्तरावर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी हृषीकेश मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेवून हा निर्णय घेण्यात आला असून पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची आणखी संधी मिळणार आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार म्हणून नोंदणी न झालेल्या वंचित नागरिकांना मतदार नोंदणीची संधी मिळावी म्हणून भारत निवडणूक आयोगाने २३ व २४ फेब्रुवारी २०१९ रोजी रोजी विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक मतदान केंद्र स्तरावर या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान मतदार यादीत नाव समाविष्‍ट करण्‍यासाठी नमुना ६ अर्ज, मतदार यादीत नाव समाविष्‍ट करण्‍यासाठी अनिवासी मतदाराने नमुना ६ अ अर्ज, मतदार यादीतील नावास आक्षेप घेण्‍यासाठी किंवा नाव वगळण्‍यासाठी नमुना ७ अर्ज, मतदार यादीतील नोंदीच्‍या तपशिलामध्‍ये करावयाच्‍या दुरुस्‍तीसाठी नमुना ८ अर्ज अथवा मतदार यादीतील नोंदीचे स्‍थानांतर करण्‍यासाठी नमुना ८ अ अर्ज सादर करता येतील. सर्व अर्जांचे नमुने संबंधित मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

दि. १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित प्रसिद्ध अंतिम मतदार यादीत नाव नसलेल्या सर्व पात्र नागरिकांनी विशेष मतदार नोदणी मोहिमेदरम्यान आपल्या नजीकच्या मतदान केंद्रावर जावून आपले नाव मतदार यादीत नोंदवावे. तसेच ज्यांच्याकडे मतदान ओळखपत्र आहे, त्यांनीही आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून घ्यावी, मतदार यादीत नाव नसल्यास या मोहीम कालावधीत मतदार यादीत नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.