पेंढरी तालुक्याची लोकचळवळीतून मागणी

0
9

गडचिरोली(अशोक दुर्गम)दि.21ः जिल्ह्यातील धानोरा तालुका मुख्यालयापासून ६५ किमी अंतरावर असलेल्या पेंढरी ला तालुकास्थळ बनवा यासाठी लोकचळवळ उभारली गेली असून स्वतंत्र पेंढरी तालुका निर्मितीसाठी संयुक्त गाव गराणज्य ग्रामसभा परिषद तथा तालुका निर्माण कृती समिती पेंढरीच्यावतीने २0 फेब्रुवारी रोजी जारावंडी व पेंढरी-धानोरा-गडचिरोली चौरस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या ठिय्या आंदोलनात परिसरातील ५0 ग्रामसभांचे जवळपास १0 हजार नागरिक सहभागी झाले होते.
५0 गावांमधील महिला व पुरुष ढोल, ताशांच्या निनादात आदिवासी नृत्य करीत पेंढरी येथे पोहचले. ‘मावा नाटे-मावा राज’,’ना विधानसभा – ना लोकसभा, सबसे उँची ग्रामसभा’,’पेंढरी तालुक्याची निर्मिती झालीच पाहिजे’ अशा घोषणा देत हजारो नागरिकांनी पेंढरी-जारावंडी क्रॉसिंगवर ठिय्या आंदोलन केले.
या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास दुल्लमवार, संयुक्त गाव गणराज्य ग्रामसभा परिषदेचे अध्यक्ष देवसाय आतला, माजी पंचायत समिती सभापती रामेश्‍वरी नरोटे, पंचायत समिती सदस्य रोशनी पवार, माजी सरपंच अरुण शेडमाके, माजी सरपंच बावसू पावे, दुर्गापुरच्या सरपंचा मनिषा टेकाम, झाडापापडाच्या सरपंचा प्रियंका नाईक, मसरु तुलावी, बारसू दुग्गा, दिनेश टेकाम, छबिलाल बेसरा, रुपेन नाईक यांच्यासह ग्रामसभा, महिला ग्रामसंघाचे प्रतिनिधी व गावकर्‍यांनी भाग घेतला होता.
यावेळी सर्वांनी सांगितले की, धानोरा या तालुका मुख्यालयापासून पेंढरी गावाचे अंतर ६५ किलोमीटर आहे. दळणवळणाची साधने नसल्याने शासकीय कामाकरिता धानोरा येथे गेल्यास मुक्काम करण्याची वेळ येते. २0 ते ३0 वर्षांपूर्वी झालेला मुख्य रस्ता उखळला असून, त्याची डागडुजी केली जात नाही. दळणवळणाची साधने नाहीत. टीएसपीचा निधी कुठे जिरतो, हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे पेंढरी परिसराच्या विकासाकरिता स्वतंत्र तालुक्याची निर्मिती करावी, अन्यथा २१ ला बाजारपेठ बंद, २२ ला शासकीय कामे बंद, २३ ला तालुकास्थळी मोर्चा, २४ ला जिल्हा मुख्यालयावर मोर्चा, २५ पासून साखळी उपोषण व १ मार्चला जेलभरो आंदोलन करण्यात येईल, शिवाय लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकला जाईल, असा इशारा ग्रामसभांच्या प्रतिनिधींनी दिला.