शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळा-प्रा.येलेकर

0
14

गडचिरोली,दि.01 मार्चः- इयत्ता १0 वी व १२ वीच्या शालांत परीक्षांच्या कामामध्ये व्यस्त असणार्‍या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्यात यावे, अशी मागणी डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर यांनी राज्य निवडणूक आयुक्तांकडे निवेदनातून केली आहे.
प्रा. येलेकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १२ वीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून इयत्ता १0 वीची परीक्षो १ मार्चपासून सुरू होत आहे. याच कालावधीत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २0१९ एप्रिल महिन्यामध्ये येत आहे. ही निवडणूक पार पाडण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांच्या निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. यासाठीचे प्रशिक्षण १ व २ मार्च रोजी आयोजित करण्यात आले आहे. निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त्या मिळालेले बरेचशे शिक्षक इयत्ता १२ वी व १0 वीच्या परीक्षांचे केंद्रसंचालक आहेत. त्यामुळे १ व २ मार्च रोजी आयोजित निवडणुकीच्या प्रशिक्षणाला जायचे की केंद्र संचालक म्हणून परीक्षा पार पाडावयाच्या, हा मोठा प्रश्न शिक्षकांपुढे निर्माण झाला आहे. तसेच जवळपास सर्वच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त्या केल्या असल्यामुळे इयत्ता १0 वी व १२ वीच्या परीक्षांचे पर्यवेक्षण कोणी करायचे, असाही प्रश्न केंद्र संचालक शिक्षकांनी उपस्थित केला आहे.लोकसभा निवडणूक एप्रिल २0१९ मध्ये होणार आहे. मार्च ते एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत १0 वी व १२ वीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे परीक्षण व समीक्षण सुरू राहणार आहे.