चितळाची शिकार, तिघांना अटक

0
21

गडचिरोली,दि.01 मार्च : जिल्ह्यातील एटापल्लीपासून १२ किलोमीटरवर असलेल्या गेदा गावातील युवकांनी भरमार बंदुकीने चितळाची शिकार केल्याप्रकरणी वनविभागाने तीन आरोपींना अटक करुन अहेरी न्यायालयात आज शुक्रवारी हजर केले.त्या तिघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठविले.२५ ते २७ फेब्रुवारी असे तीन दिवस गेदा गावात मोठा उत्सव ठेवून नवीन हनुमान मंदिरात हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार २५ पासून एक चितळ मंदिर परिसरात व गावात फिरत होते.मूर्तीची स्थापना झाल्याने सव्वा महिना मांस-मटन न खाण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला होता. त्यामुळे त्या चितळाची शिकार करण्यास गावकऱ्यांचा विरोध होता. परंतु २८ ला मंदिर परीसरात फिरत असलेल्या चितळाला गावातील मुलाजी उलके मट्टामी (२८) या युवकाने भरमार बंदुकीने गोळी झाडून ठार केले. ही माहिती गावक-यांनी वनविभागाला दिली. एटापल्लीचे वनपरिश्रेत्र अधिकारी संजूदास राठोड, वनपाल दुर्गेश तोगरवार, वनरक्षक पाटील यांनी गावात जाऊन आरोपीच्या घरातून शिकार केलेल्या चितळाला ताब्यात घेतले. याशिवाय या कामात मदत करणा-या बाबुराव राजू पुंगाटी (३२) आणि ईश्वर राजू पुंगाटी (२९) या दोन भावांनाही अटक केली आहे.