सावली येथील अद्ययावत पोलीस ठाण्याचे लोकार्पण

0
35

सावली, दि २ मार्च : समाजातील दुर्जन शक्तीचा पराभव करण्यासाठी सज्जनशक्ती सक्रिय होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील पोलीस दलाने अतिशय उत्तमपणे आपले कार्य करावे,असे वाटत असेल तर समाजातील सर्व सज्जन शक्तीने देखील पोलीसांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन राज्याचे वित्त,नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली शहरातील अद्यावत पोलीस ठाण्याचे उद्घाटन करताना ते बोलत होते.

महाराष्ट्रात अतिशय उत्तम अशा पोलिस वसाहती व पोलिस ठाण्यांचा जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्ह्याचे नाव लौकिक वाढत आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सावली येथील आणखी एका पोलीस ठाणे जनतेला लोकार्पित केले. अतिशय उत्तम प्रशासकीय व्यवस्था असणारे हे ठाणे आता सावली शहराची ओळख बनणार आहे.या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर चिमूर -गडचिरोली भागाचे खासदार अशोक नेते, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे,जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी,माजी आमदार अतुल देशकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष कृष्णा सहारे, सभापती संतोष तगडपल्लीवार, नगराध्यक्ष विलास यासलवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अविनाश पाल, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काॅवत आदींची उपस्थिती होती

चंद्रपूर जिल्ह्यातील पोलिस दलाचे कौतुक करताना त्यांनी आपल्या प्रत्येक प्रस्तावाला जिल्हा पोलीस अधीक्षक उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. जिल्ह्यामध्ये पोलीस दलाला महाराष्ट्रातील उत्तमोत्तम सुविधा देण्याची आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. चंद्रपूर जिल्हा पोलीसांनी सायबर क्राईम क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम काम केले असून जिल्ह्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेबाबत अतिशय काटेकोरपणे काम करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. २६ जानेवारीला जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आलेल्या सारथी या उपक्रमाची यावेळी माहिती दिली. या उपक्रमाला जिल्ह्यामध्ये अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत असून सध्या चंद्रपूर शहरासाठी महिलांना रात्री आवश्यकतेनुसार वाहन उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमाचा लवकरच विस्तार केला जाणार आहे .याशिवाय टोल फ्री क्रमांकावर मदत मागण्याची देखील सुविधा दिली असल्याचे त्यांनी सांगितले. रात्रपाळीत काम करणाऱ्या कोणत्याही महिलेची सुरक्षा आता चंद्रपूरचे पोलीस दल उचलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यामध्ये अतिशय उत्तम सोयीसुविधा पोलिसांना देण्याकडे आपला कल असून महाराष्ट्रातील सर्वोत्तम असा जीम सध्या चंद्रपूर पोलीस दलाकडे आहे. पोलीस दलाला वाहने उपलब्ध केली आहे. राहण्याची उत्तम सुविधा देखील पुरविली जात आहे. पोलिस वसाहती अद्यावत होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सगळे पोलिस स्टेशन अतिशय उत्तम केले जातील. याशिवाय सीसीटीव्हीने ते जोडले जाईल. ज्यामुळे पोलीस स्टेशन मध्ये येणाऱ्या कुठल्याही सज्जन व्यक्तीला त्रास होणार नाही. मात्र येणाऱ्या योग्य व्यक्तीच्या तक्रारी दाखल करून त्याला योग्य न्याय दिला जाईल, याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या ठिकाणच्या उत्तम अशा पोलिस ठाण्यांमध्ये उत्तम असे पोलिस प्रशासन दिसायला पाहिजे,असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी केले. संचालन पोलीस उपनिरीक्षक श्री. मुंडे यांनी केले.