प्राणहिता व दिना नदीपात्रात वन विभागाची धाड

0
20

गडचिरोली,दि.३::  जिल्ह्यातील अहेरी वन परिक्षेत्रातील प्राणहिता व दिना नदीच्या पात्रात सागाच्या लाकडांपासून नाव तयार करण्याच्या ठिकाणावर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाड टाकून सुमारे ६० हजार रुपये किमतीचे सागवानी लाकूड व अन्य साहित्य शनिवारला जप्त केले आहे.
प्राणहिता व दिना नदीच्या पात्रात अवैधरित्या नाव तयार केल्या जात असून त्यासाठी सागवानी लाकडांचा वापर केला जातो अशी गोपनीय माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार वन विभागाच्या पथकाने नदी पात्रात धाड टाकून कारवाई केली. घटनास्थळावरून जवळपास ६० हजार रुपये किमतीचे लाकूड जप्त केले. वन विभागाचे पथक आल्याची चाहूल लागताच वनतस्करांनी नदी पात्रात उडी मारून पलिकडे पळून जाण्यात यशस्वी झाले. घटनास्थळावर जेवनाचे डबे व अन्य साहित्य आढळून आले आहेत. जेवनाच्या डब्यांवरून आरोपींचा शोध घेतला जाणार आहे.
सदर कारवाई आलापल्ली वनविभागाचे उपविभागीय वनाधिकारी नितेश देवगडे यांच्या नेतृत्वात वनपाल योगेश शेरेकर, रामाराव देवकते, वनरक्षक मालू कुड्यामी, दामोधर चिकाने, नंदकिशोर खोब्रागडे, वनमजूर गोपाल आत्राम, बंडू रामगिरवार, वाहन चालक नानाजी सोयाम यांनी केली. घटनेचा पुढील तपास फिरत्या पथकाचे वन परिक्षेत्राधिकारी डी. एस. आत्राम, मनोज चव्हाण करीत आहेत.