झाशीनगरवासी ५० वर्षांपासून पुनर्वसन लाभापासून वंचित

0
20

अर्जुनी मोरगाव ,दि.04ःः : तालुक्यातील इटियाडोह प्रकल्प वर्ष १९७० मध्ये उदयास येऊन त्या परिसरातील नागरिकांचे पुनर्वसन प्रकल्पालगत असलेल्याझाशीनगर या गावात करण्यात आले. परंतु या ग्रामवासीयांना ५० वर्षे लोटूनही शासनाने अद्यापपर्यंत पाठपुरावा करूनही सुविधा न पुरविल्याने झाशीनगर ग्रामवासीयांनी येणाऱ्या सर्व निवडणुकींवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला आहे. .

झाशीनगर हे गाव अतिदुर्गम भागात पुनर्वसित करण्यात आले असून शासनाच्या पुनर्वसन धोरणानुसार अद्यापही अनेक सुविधांपासून वंचित आहे. याबाबत मागील ४५ वर्षांपासून झाशीनगर ग्रामस्थांनी शासकीय कार्यालयांची पायपीट करूनही आश्वासनापलीकडे काहीच हाती लागले नाही. यामुळे झाशीनगर ग्रामस्थांनी शासनाविरोधात संताप व्यक्त करून जोपर्यंत शासनाच्या पुनर्वसन धोरणानुसार ग्रामस्थांना सुविधा पुरविण्यात येणार नाही तोपर्यंत मतदान प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय निवेदनाद्वारे शासनाला कळविला आहे. .

झाशीनगरचे पुनर्वसन करताना शासनाने वनविभागाकडून जमीन घेऊन ग्रामस्थांना शेतजमिनीचे वाटप केले. परंतु सदर शेतजमिनीचे वनविभागाकडून महसूल विभागाला हस्तांतरण अद्याप करण्यात आले नसल्याने आबादी नकाशापासून व शेतीवरील झाडे शेतकऱ्यांना विकता येत नसल्याने शेतकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने पुनर्वसन केले मात्र गावात अंतर्गत रस्ते व नाल्याचे बांधकाम करण्यात आले नाही. त्यातल्या त्यात ग्रामस्थांना माहे मार्च ते जून महिन्यात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाला मोठे तोंड द्यावे लागत आहे.झाशीनगर ग्रामस्थ व परिसरातील शेतीला ओलिताची सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाने वर्ष २००० ला झाशीनगर उपसा सिंचन योजना मंजूर केली असून १९ वर्षांचा कालावधी लोटूनही शेतीला पाणीपुरवठा न झाल्याने प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. याला सर्वस्वी जबाबदार शासनाचे अधिकारीच असल्याने त्यांच्या चुकीने संपूर्ण ग्रामस्थ यातना भोगत आहेत. याकडे शासनाकडे वारंवार पत्रव्यवहार, निवेदन तसेच संबंधित वनविभाग व महसूल अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊनही झाशीनगर ग्रामस्थांच्या समस्यांचे निराकरण झाले नाही. फक्त झासीनगर ग्रामस्थांना आश्वासनाच्या खैरातीपलीकडे काहीच हाती आलेले नाही. अखेर या प्रश्नाचे जोपर्यंत निराकरण होणार नाही तोपर्यंत झाशीनगर ग्रामपंचायतचे सर्व ग्रामवासी येणाऱ्या संपूर्ण मतदान प्रक्रियेवर सामूहिक बहिष्कार टाकण्याचे निवेदन पालकमंत्री राजकुमार बडोले, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी, गोंदिया, पोलीस अधीक्षक, तहसीलदार अर्जुनी मोरगाव यांना पाठविले असून आमच्या समस्यांचे निराकरण लवकरात लवकर करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. तसेच गावालगत असलेल्या झाशीनगर उपसा सिंचन योजनेचे पाणी झासीनगर येथील शेतीला जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत अपूर्ण उपसा सिंचन योजनेचा शुभारंभ करण्यात येऊ नये अन्यथा जनआंदोलन उभारण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे..