नागभीड-नागपूर ब्रॉडगेजला रेल्वे बोर्डाची मंजुरी; खासदार अशोक नेते

0
21

गडचिरोली,दि.४: बहुप्रतीक्षित नागभिड-नागपूर ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे चंद्रपूर व गडचिरोली जिल्हावासीयांचे स्वप्न खा.अशोक नेते यांच्या प्रयत्नाने आता पूर्णत्वास जाणार आहे. केंद्र शासनाची मंजुरी मिळाल्यानंतरही मागील ४ वर्षांपासून रेल्वे बोर्डाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या नागभिड-नागपूर ब्रॉडगेज रेल्वे मार्गाला अखेर रेल्वे बोर्डाने मंजुरी प्रदान केली असून, सुमारे ९२२ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. खा.नेते यांच्या मागणीची दखल घेत अखेर नागभीड-नागपूर .ब्रॉडगेज मार्गाला रेल्वे बोर्डाची अंतरिम मंजुरी प्राप्त झाली आहे.

खा. अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते हे नागभीड-नागपूर या नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील होते. त्यासाठी त्यांनी अनेकदा केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे केंद्र शासनाने ब्रॉडगेजला मंजुरी दिली. मात्र, रेल्वे बोर्डाची मंजुरी न मिळाल्याने गेल्या ४ वर्षांपासून या ब्रॉडगेज मार्गाचे काम रखडलेले होते.त्यामुळे खासदार अशोक नेते यांनी स्वस्थ न बसता केंद्रिय रेल्वे मंत्री पियुष गोयल, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करुन मागणी रेटून धरली.

या मार्गासाठी केंद्र व राज्य सरकार प्रत्येकी अर्धा वाटा उचलणार असून एकूण ९२२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा महत्वाचा प्रश्न मार्गी लावल्याने लोकसभा क्षेत्रातील नागरिकांनी खा.अशोक नेते यांचे आभार मानले आहेत. नागभिड-नागपूर ब्रॉडगेज झाल्यास गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातील काही भागातील नागरिकांना नागपूरला कमी पैशात प्रवास करणे सुकर होणार आहे.