भंडारासारखेच येथेही फिरते पोलीस ठाणे संकल्पना राबविणार-पोलीस अधिक्षक विनीता शाहू

0
21

गोंदिया , दि. ०५ :सामान्य माणूस किंवा महिला यांच्यामध्ये पोलीसासंदर्भात भिती असते ती भीती मनात राहू नये,यासाठी गावखेड्यात नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी फिरते पोलीस ठाणे (मोबाईल पोलीस ठाणे) ही संकल्पना गोंदिया जिल्ह्यात राबविणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विनीता शाहू यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात मंगळवारी (दि.५) आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून काम करताना ज्या धर्तीवर काम केले त्याच धर्तीवर गोंदिया जिल्ह्यातही काम करायचे आहे.परंतु दोन्ही जिल्ह्यातील समस्याही वेगवेगळ्या आहेत.याठिकाणी गुन्ह्याचे प्रमाण अधिक आहे. महिलांचे कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे असोत किंवा अल्पवयीन मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण असो यावर जनजागृती व समुपदेश करणार आहोत. वृध्दांच्या समस्या मार्गी लावणार आहोत. फिरते पोलीस ठाण्यात एक अधिकारी दोन कर्मचारी राहणार आहेत.जिल्हास्थळावरुनच सर्व पोलीस ठाणे व चौक्यातील पोलीस अधिकारी यांच्याशी व्हीडीओकाॅन्फरंसच्या माध्यमातून सपंर्क करुन जाणेयेण्याचा वेळ वाचविला जाणार असेही सांगितले.
हेल्मेट सक्तीपेक्षा हेल्मेट सुरक्षेचे आहे हे समजून स्वयंस्फूर्तीने घालायला हवे असे त्यांनी सांगितले. हेल्मेट किती महत्त्वाचे आहे यासंदर्भात त्यांनी विविध दाखले दिलेत. गोंदिया जिल्ह्यातून चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत आहे. त्यावर आळा घालण्यात येणार आहे.जुन्या पोलीस अधीक्षकांचा आॅपरेशन आॅल आऊट हा उपक्रम सातत्याने सुरू ठेवणार आहे. गोंदियात नकली,दारु,तेल औषधांपासून अनेक नकली साहित्य तयार होतात. त्यावर आळा घालण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
गोंदिया शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार, बंद असलेल्या ट्राफीक सिग्नलसोबतच रेल्वेस्थानकाच्यादोन्ही भागातील अतिक्रमण व बंद असलेली पौलीस चौकीकडे लक्ष वेधण्यात आले.सोबतच पतंगा मैदान चौक व मरारटोली चौकातील अपघातावर आळा घालण्यासाठी मोठे राऊंड तयार करण्यासंदर्भात सुचना मांडल्या गेल्या. शहरातील घडामोडींवर लक्ष घालण्यासाठी १३० कॅमेरे लवकरच लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस कल्याण निधीकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता त्यांनी पोलीस कल्याण निधीसाठी विविध संकल्पना असून पोलीस कल्याण निधी वाढविण्यासाठी भंडारासारखे गोंदियातही प्रयत्न करू असे त्या म्हणाल्या. यावेळी उपपोलीस अधिकारी चांदा व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर ठोसरे उपस्थित होते.