प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना,असंघटीत कामगारांना बनविणार आत्मनिर्भर

0
17
????????????????????????????????????
  • प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते योजनेचे लोकार्पण
  • श्रमिकांना मासिक ३ हजार रुपये मासिक पेंशनची हमी

वाशिम, दि. ०५ : असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचे आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील वस्त्राल येथून डिजिटल लाँचिंग पद्धतीने लोकार्पण केले. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण वाशिम नियोजन भवन येथे आयोजित जिल्हास्तरीय लोकार्पण कार्यक्रमात करण्यात आले. जिल्हास्तरावर जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांच्या हस्ते योजनेचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक सुरज गोहाड, जिल्हा कामगार अधिकारी श्री. महल्ले यांच्यासह संघटीत क्षेत्रातील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रधानमंत्री मोदी म्हणाले की, रिक्षाचालक, भाजी विक्रेता, फेरीवाला, कचरा गोळा करणारा, शिलाई कामगार, चर्मकार, घरेलु कामगार, छोट्या दुकानात अथवा कारखान्यात काम करणारे कामगार, विविध क्षेत्रातील मजूर या असंघटीत स्वरूपाच्या कामगारांना त्यांच्या मासिक उत्पन्नातून आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक अथवा बचत करणे शक्य होत नाही. त्यामुळे वृद्धापकाळात त्यांची हेळसांड होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे असंघटीत क्षेत्रातील प्रत्येक श्रमिकाला, कामगाराला आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र सरकार प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना सुरु करीत आहे.

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेमुळे श्रमिकांना त्यांच्या वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यानंतर किमान ३ हजार रुपये पेंशन मिळणार आहे. १८ ते ४० वर्षे वयोगटातील कामगारांना, श्रमिकांना या योजनेत सहभागी होता येणार असून त्यांच्या वयानुसार किमान ५५ ते जास्तीत जास्त २०० रुपयेपर्यंत मासिक हप्ता त्यांना भरावा लागेल, तितकीच रक्कम केंद्र सरकार त्यांच्या खात्यात जमा करणार आहे. देशभरातील सुमारे ४२ कोटी असंघटीत कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशभरातील सुमारे ११.५१ लक्ष लाभार्थ्यांच्या खात्यात केंद्र सरकारच्या हिस्स्याची सुमारे १३.५८ कोटी रुपये रक्कम ऑनलाईन पद्धतीने जमा करून योजनेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच यावेळी उपस्थित देशभरातील विविध राज्यातून आलेल्या लाभार्थ्यांना योजनेत सहभागी झाल्याचे प्रमाणपत्रांचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेत सहभागी झालेल्या लाभार्थ्यांना जिल्हास्तरीय कार्यक्रमातही जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या हस्ते योजनेचे कार्ड वितरीत करण्यात आले. यामध्ये बँक सखी, घरेलू कामगार, पेंटर, बांधकाम कामगार आदी क्षेत्रातील कामगारांचा समावेश होता.