वडिलांच्या अंत्ययात्रेनंतर ‘मुलीने’ दिला पेपर

0
14

लाखांदूर,दि.06 – भावनेपेक्षा कर्तव्य मोठे, असे म्हणतात.त्यातच दहावीचा इंग्रजीचा पेपर. अशावेळी वडिलांचा मृत्यू होतो. संपूर्ण कुटुंबावर जणू आभाळच कोसळते. काय करावे आणि काय नाही, अशी तिची अवस्था होते. मात्र, एका क्षणी ती निश्‍चय पक्का करते.वडिलांची अंत्ययात्रा निघताच तीसुद्धा सर्व दुःखवेग आवरून इंग्रजीच्या पेपरला जाते. मनाला पाझर फोडणारा हा प्रसंग  मंगळवारला तालुक्यातील खैरीपट येथे घडला.सोमवारी (दि. ४) खेमराज यांचे निधन झाले. संपूर्ण कुटुंब दु:खात बुडाले.तिकडे मंगळवारी सकाळी ११ वाजता प्रणालीचा इंग्रजीचा पेपर होता. सकाळीच अंत्यविधीची तयारी करण्यात आली आणि अंत्ययात्रा निघाली. त्यानंतर लगेच प्रणाली इंग्रजीचा पेपर सोडविण्यासाठी लाखांदूरला आली. वडिलांच्या मृत्यूचे दु:ख मनात ठेवून तिने जिल्हा परिषद हायस्कूलमधील केंद्रात पेपर सोडविला.

खैरीपट येथील खेमराज मेश्राम (वय ४५) एसटी महामंडळाच्या पवनी आगारात चालक पदावर कार्यरत होते. सर्वकाही सुरळीत असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडते. तपासणीनंतर त्यांना कर्करोग  झाल्याने निदान होते. त्यांची मोठी मुलगी प्रणाली लाखांदूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात दहाव्या वर्गात शिकत होती.जीवनातील महत्त्वाची दहावीची परीक्षा एक मार्चपासून सुरू झाली. इकडे वडिलांची प्रकृतीसुद्धा खालावत होती. नियतीने डाव साधला अन्‌ प्रणालीचे पितृछत्र हरविले.