विद्यार्थ्यांनी ईव्हीएम-व्हीव्हीपॅट कार्यपद्धतीची माहिती सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचवावी-विभागीय आयुक्त पीयूष सिंह

0
12
????????????????????????????????????
  • राजस्थान आर्य महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम

वाशिम, दि. ०७ : ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या वापरामुळे मतदान प्रक्रियेविषयी असलेल्या शंका दूर होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी व युवकांनी दोन्ही यंत्रांची कार्यपद्धती समजून घेवून त्याची माहिती आपल्या गावातील, घरातील मतदारांपर्यंत पोहोचवावी. जेणेकरून त्यांच्या मनातील शंका दूर होण्यास मदत होईल, असे मत विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी व्यक्त केले. वाशिम येथील राजस्थान आर्य महाविद्यालय येथे आज आयोजित ईव्हीएम व व्हीव्हीपॅटविषयक जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, उपविभागीय अधिकारी पी. एस. राऊत, तहसीलदार विजय साळवे, प्राचार्य मिलन संचेती, नायब तहसीलदार श्री. दंडे, श्री. बनसोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. सिंह म्हणाले, विद्यार्थ्यांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या मतदान प्रक्रियेतील वापराबाबतची माहिती समजून घ्यावी. तसेच ईव्हीएम अथवा व्हीव्हीपॅट विषयी कोणतीही शंका असल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडून त्या शंकेचे निरसन करून घ्यावे. जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून ईव्हीएम व व्हीव्हीपॅटविषयी मिळालेली माहिती आपल्या नातेवाईक तसेच गावातील इतर मतदारांपर्यंत पोहोचवून मतदान प्रक्रियेविषयी त्यांच्या मनातील गैरसमज दूर करावा, असे आवाहन त्यांनी केले. वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव मतदार यादीत नोंदविणे आवश्यक असून प्रत्येक विद्यार्थ्याने याबाबत सजग रहावे. तसेच मतदार यादीत नाव नोंदविलेल्या प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, मतदानादरम्यान ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅटचा वापर होणार असल्याने मतदाराला आपले मत योग्य प्रकारे नोंदविले गेले अथवा नाही, हे पाहता येणार आहे. त्यामुळे त्याच्या मनात मतदान प्रक्रियेविषयी असलेला गैरसमज दूर होईल.यावेळी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या सहाय्याने मतदानाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. तसेच ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या कार्यपद्धतीविषयी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे माहिती देण्यात आली.