नवमतदार नोंदणीची प्रक्रिया अचूकपणे राबवा-विभागीय आयुक्त पीयूष सिंह

0
10
????????????????????????????????????
  • लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पूर्वतयारीचा आढावा

वाशिम, दि. ०७ : वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येकाला आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, याकरिता भारत निवडणूक आयोगाने २३ व २४ फेब्रुवारी आणि २ व ३ मार्च रोजी विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून नवमतदार नाव नोंदणी प्रक्रिया अचूकपणे राबविण्याच्या सूचना विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज आयोजित लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखेडे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी (महसूल) आर. डी. काळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, उपविभागीय अधिकारी पी. एस. राऊत, डी. ए. गोगटे, अनुप खांडे, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. विनय राठोड, नगरपालिका प्रशासन अधिकारी दीपक मोरे यांच्यासह तहसीलदार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. सिंह म्हणाले, वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक व्यक्तीचे नाव मतदार यादीमध्ये नोंदविले जावे, यासाठी भारत निवडणूक आयोग आग्रही आहे. विशेषतः १८ ते १९ वर्षे वयोगटातील अद्याप मतदारयादीत नाव न नोंदविलेल्या युवकांची मतदार नोंदणी करण्यासाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहेत. मतदार नोंदणीच्या नियमित कार्यवाही दरम्यान अशा युवकांकडून मतदार नोंदणी अर्ज प्राप्त करून त्यांची नावे मतदार यादीत नोंदविली जावीत. तसेच विशेष मतदार नोंदणी मोहिमेदरम्यान प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून नवमतदार नोंदणी, दुबार नोदणी झालेल्या मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही गतिमान करावी.

जिल्ह्यात नव्याने प्राप्त झालेल्या ४४ हजार ४७४ मतदार ओळखपत्रांपैकी ३२ हजार १५१ मतदार ओळखपत्रांचे वाटप पूर्ण झाले आहे. उर्वरित मतदार ओळखपत्रांचे वाटपही तातडीने पूर्ण करावे. आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने आतापासूनच प्रयत्न करावेत. याकरिता स्वीपच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबविण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्तांनी यावेळी दिल्या.लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आवश्यक मनुष्यबळ व्यवस्थापन, मतदार केंद्रांवरील सुविधा, वाहतूक व्यवस्था, ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची उपलब्धता यासह निवडणूकविषयक विविध बाबींचा यावेळी आढावा घेण्यात आला.