कंत्राटी आरोग्य सेविकांना नोकरभरतीत राखीव जागा आवश्यक- डॉ. अशोक बेलखोडे

0
18

औरंगाबाद, दि.07 :- ग्रामविकास विभागाने नुकतीच नोकरभरती करणार असल्याचे सांगितले आहे. या भरतीत कंत्राटी आरोग्य सेविकांना राखीव जागा ठेवाव्यात. मराठवाड्यात मागील दहा वर्षात एक हजार 431 आरोग्य सेविका नियुक्त केलेल्या आहेत. त्यात कंत्राटी आरोग्य सेविकांचा समावेश नाही. मराठवाड्याच्या उत्तम आरोग्यासाठी या नोकरभरतीत सुधारणा करून कंत्राटी आरोग्य सेविकांना जागा राखीव ठेवणे आवश्यक असल्याचे मराठवाडा विकास मंडळाच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष तथा तज्ज्ञ सदस्य डॉ. अशोक बेलखोडे यांनी सांगितले.
मराठवाडा विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित मराठवाडा व्हिजन 2030 डॉक्युमेंटेशन बाबत आढावा बैठकीत श्री. बेलखोडे बोलत होते. यावेळी मराठवाड्यातील आरोग्य यंत्रणेचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
डॉ. बेलखोडे म्हणाले, मराठवाड्यातील शेवटच्या माणसापर्यंत आरोग्य सेवा उत्तमप्रकारे देण्यासाठी मराठवाडा व्हिजन 2030 उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी सर्व यंत्रणांनी सर्वसमावेशक दृष्टीकोनातून सकारात्मकतेने पुढाकार घ्यावा. आरोग्य सुविधा, प्रतिबंधात्मक उपाययोजना, आरोग्य सेवा देताना येणाऱ्या अडचणी, आवश्यक सोयी सुविधा, करावयाचे बदल, रिक्त पदे, नाविन्यपूर्ण योजना याबाबतही मंडळाला सविस्तर माहिती द्यावी, अशा सूचनाही श्री. बेलखोडे यांनी दिल्या.
कंत्राटी आरोग्य सेविकांचा पदभरतीत सकारात्मकपणे विचार करावा. त्यामध्ये पाच वर्षांपेक्षा अधिक अनुभव असलेल्या कंत्राटी आरोग्य सेविकांना प्राधान्य देण्याचा विचार करावा. पदभरती राबवताना प्रात्यक्षिक व अनुभवावर भर द्यावा, अशा सुधारणा होणे आवश्यक असल्याचेही श्री. बेलखोडे म्हणाले.
मराठवाड्याच्या विकासासाठी आरोग्य महत्त्वाची बाब आहे. मराठवाड्यातील ग्रामीण आरोग्य अधिक चांगले व्हावे. आदिवासी भागात नर्सिंग महाविद्यालय व मराठवाड्यात फिजिओथेरपी महाविद्यालय, सुपरस्पेशालिटी, मेंटल रूग्णालय, दंत माहाविद्यालय सुरू व्हावे. वैद्यकीय महाविद्यालय, सुपरस्पेशालिटी अनुशेष भरून निघावा, याबाबतही श्री. बेलखोडे यांनी विचार मांडले. तसेच मराठवाड्यातील आगामी दहा वर्षांचा विचार करून व्हिजन डॉक्यमेंटसाठी सर्वांनी हातभार लावावा. त्याचबरोबर आरोग्य सेवा उत्तम देण्यासाठी मराठवाड्यातील आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी ‘स्वातंत्र्यानंतर मराठवाड्याचे आरोग्य आज, काल आणि उद्या’ या विषयावरील ग्रंथनिर्मितीसाठीही पुढाकार घ्यावा, असे आवाहनही श्री. बेलखोडे यांनी केले. मराठवाड्यातील आरोग्य सुविधा व रिक्तपदांचाही त्यांनी सविस्तर आढावा घेतला.बैठकीस डॉ. पी.एस.कापसे, डॉ. व्ही.आर.मेकाने, डॉ. एस.बी. भायेकर, डॉ. जी.एम. कुडलीकर, डॉ.पी.एम.कुलकर्णी, डॉ.आर.एस.पाटील, डॉ. अनिल रूईकर, डॉ. आर.बी. देशपांडे, डॉ.बी.आर. ढाकणे, डॉ. गजानन परळीकर, डॉ. फुलारी एस.एस, डॉ. ए.सी. पंडजे आदींची उपस्थिती होती.