आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे : डॉ. बलकवडे

0
24

गोंदिया,दि.09 : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२0१९ च्या अनुषंगाने जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार अधिकारी व कर्मचार्‍यांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर ८ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांची बैठक घेवून निवडणूकीसंदर्भात माहिती दिली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) एस.एन.चौधरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
डॉ.बलकवडे पुढे म्हणाल्या, लोकसभा निवडणूकीदरम्यान जिल्ह्यात रोकड वाहतूक व दारुच्या वाहतुकीवर कडक निबर्ंध घालण्याच्या सूचना पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणूक शांततेच्या वातावरणात व निष्पक्षपणे पार पाडावे. आचारसंहितेत कोणत्याही अधिकार्‍यांनी राजकीय पदाधिकार्‍यांशी भेट घेवू नये, नाही तर त्यांच्यावर नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
निवडणूकीत अधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी निष्पक्षपणे काम करावे. आचारसंहिता लागू होताच पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्थेचा चोखपणे बंदोबस्त ठेवावा. धार्मिक स्थळावर निवडणूकीचा प्रचार करणे पूर्णत: बंदी आहे. दुसर्‍याच्या नावावर मतदान करणे हा एक गुन्हा आहे. मतदान करण्याकरीता दिव्यांग व्यक्तीची जाण्या-येण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी. निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणारे लाऊडस्पीकर फक्त सकाळी ६ ते रात्री १0 पयर्ंत चालू राहील याची पोलीस विभागाने विशेष दक्षता घ्यावी. राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचाराच्या रोड शो साठी पोलीस विभागाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. निवडणूक प्रचारादरम्यान प्लास्टीकचा वापर टाळायचा आहे.
निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर नविन कार्यक्रम सुरु करता येणार नाही याची सर्व विभागांनी दक्षता घ्यावी. निवडणूकीविषयी कुठलीही सभा होत असेल तर पोलीस विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. आचारसंहिता लागू होताच शासकीय होर्डींगवरील फ्लेक्स २४ तासात काढून घ्यायचे आहेत, तर खाजगी क्षेत्रातील होर्डींगवरील फ्लेक्स ७२ तासात काढायची आहेत, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक तसेच जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख उपस्थित होते.