महिलादिनीच महिलांनी पकडले अवैध दारुचे वाहन

0
16

गोरेगाव,दि.10: सर्वत्र जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू असताना गोरेगाव तालुक्यातील तिल्ली मोहगाव येथील दारूबंदी समिती, महिला बचत गट व इतर महिलांनी रात्रभर गावात गस्त घालून अवैध दारू पकडून एक आगळा-वेगळा महिला दिवस साजरा केल्याचे चित्र ८ मार्च रोजी पहावयास मिळाले. विशेष म्हणजे या महिलांनी तीन पेटया अवैध दारूसह एक कारही पकडली. तर अवैध दारू, कार व आरोपीला गोरेगाव पोलिसांच्या स्वाधिन केले. पोलिसांनी अवैध दारू व कार जप्त केली असून आरोपीला अटक केली आहे. विशेष म्हणजे महिलांच्या या कामगीरीने जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिलांनी सक्षमीकरणाचा दाखला दिला असल्याच्या चर्चा होत असून सर्वत्र या महिलांचे कौतूक करण्यात येत आहे.
दारुमुळे अनेकाचे संसार उध्वस्त झाले. त्यामुळे शासनाच्या वतीने ग्रामीण महिलांना गावातील दारु बंद करण्यासाठी काही अटी व शर्तीच्या आधारावर दारुबंद करण्याचा अधिकार देण्यात आला. अनेक गावात दारु बंद करण्यात आली. त्याचप्रमाणे गोरेगाव तालुक्यातील तिल्ली मोहगाव येथे ४२ महिला बचत गटातून निवडक महिलांनी दारुबंदी समिती गठीत करुन दारु बंदी करण्याचा निर्णय घेतला. बघता बघता गावात दारु बंदी काही प्रमाणात यशस्वी झाली. पण काही बाहेरचे दारु विक्रेते आजूबाजूला दारु पोच करुन दारु विक्री करीत आहे. याची सुचना समितीला मिळाली व समितीच्या ६0 ते ७0 महिलांनी ७ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिनाच्या पूर्व संध्येला महिला सक्षमीकरणाची प्रचीती दारु विक्रेत्यांना दिली. परिसरात अनेक ठिकाणी पहारा देऊन रात्रभर जागत पहाटे ४ वाजता कारसह देशी दारुच्या ३ पेट्या पकडल्या .
दरम्यान, घटनेची माहिती गोरेगाव पोलिसांना देण्यात आली. गोरेगावचे ठाणेदार दसूरकर, बीट जमादार गणवीर यांनी घटनास्थळ गाठून १0 हजार रुपये किमतीची अवैध दारू व ८0 हजार रुपये किमतीची नैनो कार असा ९0 हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीला अटक केली आहे.