खासदार संजय काकडे यांची भाजपला सोडचिठ्ठी,विखेंचे पुत्र सुजय जाणार भाजपमध्ये

0
18

मुंबई(विशेष प्रतिनिधी),दि.11 – राज्यसभेत भाजपचे सहयोगी खासदार या नात्याने मी कायमच भाजपचे समर्थन केले. पण, भाजप प्रदेशाध्यक्ष, अन्य नेते, तसेच कार्यकर्त्यांनी कायम दुय्यम वागणूक दिली. सतत दुजाभाव केला. माझ्या कामाची नोंद घेतली नाही. त्यामुळे मी सर्व विचारधारा सामावून घेणाऱ्या काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगत खासदार संजय काकडे यांनी रविवारी भाजपला सोडचिठ्ठी दिली. तर दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यातील वरिष्ठ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डाॅ. सुजय मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अहमदनगर लाेकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीने काँग्रेससाठी साेडण्यास नकार दिल्यामुळे अखेर त्यांनी हा निर्णय घेतला. नगरचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता कट करून डाॅ. सुजय यांना भाजपतर्फे उमेदवारी दिली जाणार असल्याचे वृत्त आहे. ही जागा जागावाटपात राष्ट्रवादीकडे आहे. डाॅ. सुजयसाठी राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेसला द्यावी यासाठी काँग्रेस नेत्यांनी खूप प्रयत्न केले. मात्र यात यश न आल्याने डाॅ. सुजय यांनी भाजपचा रस्ता निवडला.

काक़डें यांनी घोषणा केल्याने पुण्यातील संभाव्य उमेदवारीची गणिते बिघडली आहेत. काँग्रेसकडून पुण्याची लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून मी पक्ष बदलत आहे, असा याचा अर्थ नाही. उमेदवारी मिळाली नाही तरी पक्षाने दिलेली जबाबदारीही पार पाडेन, असेही काकडे यांनी स्पष्ट केले. पुण्यात रविवारी मनसेच्या गणेश सातपुते यांनी बोलावलेल्या कट्ट्यावर काकडे यांनी ही घोषणा केली. तेव्हा शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे, काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड आदी उपस्थित होते.

काकडे म्हणाले,“साडेतीन वर्षांत मी राज्यसभेत भाजपला पाठिंबा दिला. फडणवीसांच्या सांगण्यानुसार पुणे पालिकेच्या निवडणुकीत वैयक्तिक लक्ष दिले. मनपात ६० ते ६५ जागांवर विजय मिळेल, असे सर्वांना वाटत असताना मी भाजपचे तब्बल ९८ नगरसेवक निवडून आणले. पण माझ्या कामाची नोंद भाजपत घेतली गेली नाही. प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी तर कायमच दुजाभावाची वागणूक दिली. आपल्या कामाची दखल जिथे घेतली जात नाही, तिथे राहून काम करण्यापेक्षा कामाची नोंद घेणाऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय मी घेतला आहे. दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी माझी चर्चा झाली. त्यानुसार मी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे, असे काकडे यांनी सांगितले.डाॅ. सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तरी वडील राधाकृष्ण विखे व माताेश्री तथा जि.प. अध्यक्षा शालिनी विखे तूर्त काँग्रेसमध्येच राहतील. मात्र विधानसभा निवडणुकीच्या ताेंडावर १२ आमदारांसह राधाकृष्ण विखे पाटील भाजपत प्रवेश करतील, अशी चर्चा आहे.