किकरीपारजवळील नाल्यानजीक रात्रीला वाहनचालकावंर होतेय दगडफेक

0
15

गोंदिया,दि.११: आमगाव तालुक्यातील बिरसी येथून लग्नसमारंभ आटोपून आमगाव कामठामार्गे गोंदियासाठी किकरीपारवरुन येत असतांना गणेशनाला परिसरात रविवार १० मार्चला रात्री १० वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींकडून चारचाकी वाहनावर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली.या दगडफेकीमुळे वाहनाचे नुकसान झाले तर तीन ते चार जण जखमी झाले.गोंदिया निवासी स्तानंद  रहागंडाले हे बिरसी येथील लग्नसमारंभ आटोपून नवेगाव येथे नातेवाईकांना सोडण्यासाठी कामठा मार्गाने किकरीपारकडे येत असतांना मागे दुचाकीने नातेवाईक येत असल्याने हळूहळू वाहन चालवित होते.दरम्यान ते नाल्याजवळ पोचताच त्यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली.या दगडफेकीत चारचाकी वाहनाचे काच फुटले असून वाहनाचे नुकसान झाले.तर वाहनात बसलेल्यांनाही दुखापत झाली.या दगडफेकीनंतर त्यांना वाहनाचे वेग वाढवित किकरीपार गावाजवळ पोचल्यावर आरडाओरड करुन माहिती दिली.त्यापुर्वी त्याठिकाणी दोनतिन वाहने आधीच उभी होती,त्यांच्या वाहनावर सुद्दा दगडफेक करण्यात आली होती.या घटनेची माहिती आमगाव पोलीस ठाण्याच्या 100 क्रमांकावर देण्यासाठी वारंवार संपर्क संबधिताकडून करण्यात आला परंतु तो क्रमांकच लागेना.त्यामुळे सदानंद रहागंडाले यांनी बिरसी येथील लग्नात असलेले त्यांचे नागपूर निवासी नातेवाईक देवेंद्र बिसेन यांना माहिती देत पोलीस ठाण्यात माहिती देण्यास सांगितले.बिसेन हे पोलीस ठाण्यात सदर घटनेची माहिती देण्यास गेले असता स्टेशनडायरीवर हजर असलेल्या पोलीसाने आमचे गस्तीवरील वाहन आताच गस्त घालण्यासाठी गेलेले आहे,त्यांना मी माहिती देतो असे सांगून तुम्ही निघा असा निरोप दिला.त्यानंतरही रहागंडाले यांनी पोलीस स्टेशनला फोन करुन परत माहिती देण्याचा प्रयत्न केला असता सव्वालाखे नामक पोलीसांने आम्ही तपास करतोय तुम्ही सध्या गावाकडे शांततेत निघा असे सांगितले.याप्रकारामुळे रहागंडाले कुटुंबिय भितीच्या सावटाखाली असून त्यांच्या वाहनाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.तर याच नाल्यावर कातुर्ली येथील वऱ्हाडी वाहनाचे,घाटटेमणीचे जि.प. सदस्य सुरेश हर्षे यांच्या वाहनाचेही दगडफेकीमुळे काच फुटल्याची माहिती समोर आली आहे.दुग्ध व्यवसाय करणाऱ्या किकरीपार येथील दोघांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. वाहनावर दगडफेक करणारे नेमके कोण होते, त्यांचा दगड फेक करण्यामागील हेतू काय, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून या मार्गावरील रात्रीला ये जा करणार्या वाहन चालकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.या घटनेने आमगाव पोलीसांचे गुन्हेगारावर वचक राहिले नसावे अशीच म्हणण्याची वेळ आली आहे.