सुजय विखेंचं खासदारकीचं तिकीट मुख्यमंत्र्यांकडून ‘कन्फर्म

0
15

मुंबई,दि.12(वृत्तसंस्था)- सुजय विखे हे भाजपकचे नगरमधून उमेदवार असतील असे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. सुजय विखेंना घरात बंड करावा लागला याचा विचार व्हायला हवा, काही दिवसांनी घरच्यांनाही सुजय यांचा निर्णय योग्य वाटेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुजय विखेंच्या भाजपप्रवेशानंतर म्हटले आहे.या पक्ष प्रवेशावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारत हा आता कमजोर देश नाही तर मजबूत देश आहे. यामुळे संपूर्ण देशातील तरुणाई भाजपकडे येते आहे. डॉ. सुजय विखे पाटील हे याच पिढीचे प्रतिनिधित्व करतात. जे गरीब, दीन-दलित, शोषितांच्या पाठीशी आहेत, त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय सुजय यांनी घेतला आहे. भाजपचा कार्यकर्ता पक्षाचा मालक असतो, या पक्षातून चहा विकणारा माणूस देशाचा पंतप्रधान होतो.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित आज (दि. 12) सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांच्या प्रवेशाच्या चर्चा गाजत होत्या परंतु त्यांनी आज अधिकृत भाजप प्रवेश केला. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, यावेळी भाजपप्रणित युतीच्या केंद्रात 2014 पेक्षा जास्त जागा येतील, महाराष्ट्रात 48 पैकी 45 जागा येतील असेही त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर नगरच्या जागेसाठी सुजय विखे पाटील यांचं नाव भाजपच्या संसदीय मंडळाकडे पाठवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आम्ही पक्षाकडे सुजय विखेंचे नाव पाठवू, ते त्याला होकार देतील, नगरमधील जागा रेकॉर्ड मताने येईल. डॉ. सुजय विखेंनी कोणतीही अट घातली नाही, सुजय यांच्या रुपाने महाराष्ट्राला चांगले नेतृत्त्व मिळू शकते असेही फडणवीस यावेळी म्हणाले. त्याचबरोबर, भाजपच्या सर्व आमदारांशी चर्चा करुन सुजय विखेंना भाजपमध्ये प्रवेश दिला असल्याचे स्पष्टीकरणही  मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.