निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांची विविध पथके तैनात

0
17

वाशिम, दि. १२ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता जिल्ह्यात लागू झाली आहे. ही निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी, याकरिता पोलीस प्रशासन आवश्यक ती खबरदारी घेत आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था कायम रहावी, तसेच आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, याकरिता पोलिसांची विविध पथके तैनात करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस दलामार्फत देण्यात आली आहे.

निवडणूक काळात अवैध दारू, अवैध रोकड, अवैध शस्त्र, दारुगोळा इत्यादीची वाहतूक रोखण्यासाठी जिल्ह्यालगतच्या इतर जिल्ह्याच्या हद्दीवर ११ चेकपोस्ट कार्यरत करण्यात आल्या आहेत. वाशिम ते हिंगोलीमार्गावर राजगाव येथे, रिसोड ते सेनगाव मार्गावर निजामपूर फाटा, रिसोड ते लोणार मार्गावर मेहकर फाटा, वाशिम ते अकोला मार्गावर मेडशी फाटा, मालेगाव ते मेहकर मार्गावर सरहद्द पिंप्री, वाशिम ते पुसद मार्गावर पन्हाळा फाटा, कारंजा ते मुर्तीजापूर मार्गावर खेर्डा फाटा, कारंजा ते दारव्हा मार्गावर सावंगी फाटा, मानोरा ते दिग्रस मार्गावर सावळी फाटा, कारंजा ते अमरावती मार्गावर ढंगार खेडा आणि कारंजा ते वर्धा, नागपूर मार्गावर दोनद फाटा येथे या चेकपोस्ट कार्यरत राहणार असून याठिकाणी जिल्ह्यात येणाऱ्या व जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या वाहनांची अहोरात्र कसून तपासणी करण्यात येत आहे.

जिल्ह्यात १३ पोलीस स्टेशन अंतर्गत संबंधित ठाणेदारांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करण्यात आली आहे. अवैध दारू, अवैध रोकड, अवैध शस्त्र, दारुगोळा, अवैध प्रवासी वाहतूक आदी अवैध धंद्यांविरुद्ध ही पथके कार्यरत राहणार आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमीअसलेल्या ५८ व्यक्तींवर तडीपारीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. निवडणूक काळात कोणत्याही प्रकारचा घातपात होवू नये, यासाठी विशेष खबरदारी म्हणून जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी गर्दी व वर्दळीची ठिकाणे, मुख्य बाजारपेठा, बस स्टँड, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी बॉम्ब शोधक व नाशक पथकामार्फत नियमित तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अवैध धंदे व गुन्हेगारीच्या दृष्टीने संवेदनशील तसेच अवैध वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाच्या ठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत अचानक नाकाबंदी व कोंबिंग ऑपरेशन करून कडक कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील फरार व पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेवून अटकेची कार्यवाही करण्यासाठी तसेच विविध न्यायालयांकडून प्राप्त अजामीनपात्र वॉरंटची जलदगतीने अंमलबजावणी करण्यासाठी वाशिम जिल्ह्यांतर्गत १३ पोलीस स्टेशनचे स्तरावर तसेच वाशिम स्थानिक गुन्हे शाखा स्तरावर विशेष पथके गठीत करण्यात आली आहेत. अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील हिस्ट्री शीटर, समाज विघातक गुंड, निवडणूक संदर्भात दाखल गुन्ह्यातील आरोपी, उपद्रवी व्यक्ती यांना कायदा हातात न घेण्याबाबत कडक समज देण्यात आली असून कायदा हातात घेणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी १ पोलीस अधीक्षक, १ अपर पोलीस अधीक्षक, ०७ पोलीस उपअधीक्षक, २८ पोलीस निरीक्षक, १७८ सहाय्यक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक, १९६८ पोलीस कर्मचारी, ७०० गृह रक्षक दलाचे जवान तसेच केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या ०२ कंपन्या व राज्य राखीव पोलीस बलाच्या ०२ कंपन्या असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे, असे जिल्हा पोलीस दलाकडून कळविण्यात आले आहे.

आदर्श आचारसंहिता उल्लंघन करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस दलाकडून आवश्यक प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे सुध्दा सहकार्य आवश्यक असून जिल्ह्यात सुरु असलेले अवैध धंदे तसेच निवडणूक कालावधीत उमेदवार, त्यांचे प्रचारक, कार्यकर्ते व इतरांकडून आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्यास त्यांची माहिती पोलीस दलाला द्यावी, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण यांनी केले आहे. तसेच त्यांनी आपल्या ७७०९९७५९०६ या भ्रमणध्वनी क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन केले आहे.