मुख्य बातम्या:

दारु अड्यावर धाड, ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त

भंडारा,दि.13 : जवाहरनगर पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या शहापूर शेतशिवारातील सुर नदी नाल्याच्या काठावरील अवैध दारु अड्यावर धाड घातली. यात ९४ हजार ०२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन चार जणांना अटक केली. ही कारवाई बुधवारला जवाहरनगर पोलिसांनी केली.अटक करण्यात आलेल्यांमध्ये धर्मेंद्र श्रीराम रामटेके (३५), अरुण मंसाराम सेलोकर (३२), जगदीश रतिराम सेलोकर (५०), राजेश भोला सेलोकर (३७) सर्व रा. शहापूर यांचा समावेश आहे.

शहापूर शिवारात हातभट्टी लावून मोहफुलाची दारु काढण्याचे काम सुरु असल्याच्या तक्रारी होत्या. मात्र पोलिसांना दारु विक्रेत्यांना पकडण्यात यश येत नव्हते. अखेर बुधवारला जवाहरनगर पोलिसांनी शिताफीने दारुअड्यावर धाड घातली. जप्त केलेल्या साहित्यांमध्ये लोखंडी ड्रम, प्लास्टिक पिशव्या, सडवा, मोहापास, टिनाचे पिंप, जळाऊ लाकडे व इतर मुद्देमालाचा समावेश आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुभाष बारसे, पोलीस उपनिरीक्षक सतीश खेडेकर, सुधाकर शेंडे, एकनाथ जांभूळकर, प्रफुल घरडे, विवेक येरावार यांनी केली.

Share